Sun, Oct 20, 2019 12:05होमपेज › Kolhapur › दुबार कामे, एमबीमध्ये चुका केल्यास कठोर कारवाई करणार

दुबार कामे, एमबीमध्ये चुका केल्यास कठोर कारवाई करणार

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:08AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

अभियंत्याच्या कामावरून सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरल्याच्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी उपअभियंता, शाखा अभियंत्याची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना कडक शब्दांत समज दिली आहे. कामे दुबार केल्यास, एमबीमध्ये चुका आढळल्यास गय केली जाणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच दिला.

दरम्यान, शाळा दुरुस्तीची 20 लाखांची व दलित वस्ती सुधारणा योजनेतील 40 लाखांची वर्कऑर्डर न दिलेली एकूण 60 लाखांची 18 कामे रद्द करण्याचा निर्णय झाला असून उर्वरित कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण करून निधी खर्च करण्याच्या सूचनाही दिल्या. सीईओ डॉ. खेमनार यांनी जिल्ह्यातील सर्व उपअभियंते व शाखा अभियंत्यांची बुधवारी एकत्रित बैठक घेतली. 2015-16 या आर्थिक वर्षातील मंजूर झालेली पण विविध कारणांमुळे प्रत्यक्षात कामास सुरुवात होऊ न शकलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यात प्राथमिक शिक्षण विभागातील 10 तर समाजकल्याण विभागातील 8 कामे निघाली. शिक्षण विभागातील 10 कामांमध्ये शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावांचा समावेश आहे.

शाळा दुरुस्तीची कामे रद्द होण्यामध्ये मंजूर कामापेक्षा मुख्याध्यापकांनी वेगळीच मागणी केल्याने कामे करणे अशक्य आहे. समाज कल्याणमधील 8 कामांमध्ये दलित वस्तीच्या कामामध्ये मंजूर निधी कमी आणि कामे जास्त होत असल्याने ही कामे सुरू होऊ शकली नाहीत. शाळा दुरुस्तीचे 20 लाख तर दलित वस्ती सुधारणेची 40 लाखांची कामे रद्द करून नव्याने प्रस्ताव घेण्याचे ठरले. 2015-16 या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या 51 अंगणवाड्यांची 95 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येत्या 15 दिवसांत या अंगणवाड्यांच्या खर्चाची 3 कोटींची बिले काढण्याच्या सूचनाही सीईओंनी दिल्या. 2016-17 मध्ये जीएसटी आणि डीएसआरमुळे प्रलंबित राहिलेली 115 कामांचे टेंडर फ्लॅश केले असून मार्चअखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासही सीईओंनी सांगितले.