वडणगे :
निगवे दुमाला (ता. करवीर) येथील स्मशानभूमीजवळ हातपंप असलेल्या बोअरवेलमधून गेल्या चार दिवसांपासून बोअरचा हापसा न करताही आपोआप पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे गावकर्यांसाठी हा विषय कुतुहलाचा झालेला आहे. हे बोअर स्मशानाजवळ असल्याने याबाबत लोकांच्या मनात सुरुवातीला शंका आणि भीतीचे काहूरही माजले होते. काहींनी तर हा एक चमत्कारच असल्याचा दावा केला होता. आपोआप पाणी पडणार्या या बोअरची श्रध्देतून लोकांनी पूजाही केली. सोशल मिडीयावर या बोअरचा व्हीडीओ व्हायरल करून काही अफवाही पसरवण्याचा प्रयत्न झाला.
निगवे- दुमालातून शियेकडे जाणारया मार्गावर डाव्या बाजुला निगवे गावची स्मशानशेड आहे. या स्मशानशेडजवळ ग्रामपंचायतीने काही वर्षांपूर्वी हातपंप असणारे बोअर मारले आहे. मागील चार दिवसात पावसाचा जोर वाढल्यानंतर या बोअरमधून पंप न मारता आपोआप पाणी येवू लागले.हा प्रकार लक्षात आल्यानंतर हा एक चमत्कार असल्याचा दावा केला गेला.हे बोअरवेल स्मशानाजवळ असल्याने काहिंच्या मनात शंकेची पालही चुकचुकली.
सोशल मिडीयावर या बोअरचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला, तेव्हा याविषयी काही अफवाही पसरवल्या गेल्या.या बोअर विषयी अधिक माहिती जाणून घेतली तेव्हा येथील भौगोलिक रचनेचा हा परिणाम असल्याचे जाणवले.हे बोअर थोड्या सखल भागात आहे.शिवाय येथून जवळच एक ओढाही वाहतो.पावसाचा जोर वाढल्यानंतर उंचावरील पाणी सखल भागात झिरपून पाण्याची पातळी वाढल्याने, ओव्हर फ्लो होवून बोअरमधून आपोआप पाणी आले असावे.
याविषयी महावीर महाविदयालयाचे भूगोल विभाग प्रमुख डॉ.अरूण पाटील यांनी सांगितले कि,आपल्याकडे बेसाल्ट प्रकारचा खडक आहे.हा खडक काही ठिकाणी कठीण,तर काही ठिकाणी मृदू आहे.खडक जिथे मृदू आहे तेथे या खडकाची पाणी धारण क्षमता जास्त असते.त्यामुळे पावसाळ्यात अशा खडकात पाणी जास्त मुरते.त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते आणि हे पाणी ओव्हर फ्लो होवून भूपृष्ठावर येते.निगवे दुमाला येथे बोअरमधून आपोआप आलेले पाणी याच भौगोलिक कारणाने आले असावे,असे डॉ. पाटील यांनी सांगितले.