Sun, Oct 20, 2019 11:25होमपेज › Kolhapur › सीपीआरमध्ये डॉक्टरला मारहाण

सीपीआरमध्ये डॉक्टरला मारहाण

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 12:11AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रुग्णाच्या रक्‍त वाहिनीतील ब्लॉकेज काढण्याची शस्त्रक्रिया तांत्रिक कारणाने अचानक स्थगित केल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी सीपीआरमधील हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुखासह सहायकाला बेदम मारहाण केली. मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सीपीआरमध्ये तणाव निर्माण झाला होता. कर्मचार्‍यांनीही संताप व्यक्‍त केला.दरम्यान, संबंधितांनी डॉक्टरांची माफी मागितल्याने या वादावर पडदा पडला. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सु. दि. नणंदकर यांनी याप्रकरणी खंत व्यक्‍त केली. या घटनेमुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे. संबंधित डॉक्टर, सहायकांशी चर्चा करून पुढील निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पन्हाळा तालुक्यातील साठ वर्षीय वृद्धाच्या रक्‍त वाहिनीतील ब्लॉकेज काढण्यासाठी सीपीआरमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया विभागात दाखल केले आहे. शस्त्रक्रियेसाठी ‘स्टेटंस्’ सूक्ष्म उपकरणही मुंबईतून मागविले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजता शस्त्रक्रियेची वेळही निश्‍चित केली होती. मुंबईत मुसळधार पावसामुळे स्टेटंस् उपलब्ध झाले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून घेवून तांत्रिक कारणामुळे ही शस्त्रक्रिया स्थागित केल्याचे सांगितले.  सुरक्षा रक्षकासह लक्ष्मीपुरीचे पोलिस अधिकारी,  कॉन्स्टेबल घटनास्थळी दाखल झाले. मारहाण करणार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी डॉक्टर्स, कर्मचार्‍यांंनी संताप व्यक्‍त केला.

डॉक्टरांची गळपट्टी धरली !

रुग्णाच्या विभागप्रमुखांची भेट घेऊन विचारणा केली आणि वाद वाढत गेला. एकमेकाच्या अंगावर धावून गेले. डॉक्टरानींही प्रत्युत्तरकेल्याने वाद चिघळला. संबंधित नातेवाईकाने डॉक्टरची गळपट्टी धरून मारहाण केली.

संशयिताच्या लेखी माफीनाम्यामुळे तूर्त पडदा

सायंकाळी संबंधित डॉक्टरांची रुग्णालयात तपासणी केली. त्याची नोंदही सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण होताच संशयिताने अधिष्ठाता डॉ. नणंदकर व संबंधित डॉक्टरसमोर लोटांगण घातले. लेखी माफीनामा देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याची त्याने विनंती केली. त्यामुळे संबंधित डॉक्टरने आपली कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे लेखी पत्र लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडे सोपविले.

मारहाणीच्या निषेधार्थ संतप्त पडसाद

सीपीआरमधील डॉक्टरसह सहायकाला झालेल्या मारहाणीवर सायंकाळी तीव्र पडसाद उमटले. रुग्णालयातील डॉक्टर व अन्य कर्मचार्‍यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांच्याकडे संशयितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. संशयिताला माफी केल्यास भविष्यात रुग्णसेवा करणे अवघड होईल, त्यामुळे दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली.