Wed, Jul 17, 2019 18:55होमपेज › Kolhapur › शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्टरांना लाखोंचा गंडा

शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्टरांना लाखोंचा गंडा

Published On: Jan 29 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 11:46PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली शहरातील नामवंत डॉक्टरांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुणाल भरत कामत (रा. ओम बिल्डिंग, शिवाजी पेठ) आणि मुंबईस्थित एंजल ब्रोकिंग प्रा. लिमिटेड कंपनीविरोधात शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. जिल्ह्यातील 20 ते 25 डॉक्टरांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कुणाल कामत याने शहरातील डॉक्टरांचे डी-मॅट अकाऊंट काढून लाखांच्या रकमा गुंतवून घेतल्या. जुलै 2014 पासून त्याने वेगवेगळ्या कंपनींमध्ये गुंतवणूक केल्याचे कागदोपत्री या डॉक्टरांना दाखवले. 2015 पर्यंत शेअरचे दर वाढल्याचे दाखवत काहींना परतावे मिळवून देत कुणालने डॉक्टरांचा विश्‍वास संपादन केला.

शेअर बाजारात फायदा मिळत असल्याचे सांगत कामतने आणखी रकमा गुंतवून घेतल्या. याची खोटी कागदपत्रे दाखवून डॉक्टरांची दिशाभूल केली. 2016 मध्ये अनेकांच्या डी-मॅट खात्यातील रक्कम झीरो झाल्याचे लक्षात आले. यावेळी कामत याला विचारणा केली; पण त्याने पुन्हा खोटी कागदपत्रे दाखवून ती अन्यत्र वळविण्यात आल्याचे सांगून पुन्हा फसवणूक केली. शेअर्सचे परतावे मिळण्याचे बंद झाल्याने डॉक्टरांना कामतबाबत शंका आली. त्यांनी जुलै 2017 पासून त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी रक्कम देण्याचे बंद केले.

डॉक्टरांनी याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा केली; पण शेअर बाजारातील रकमेबाबत संशयित कामत याने खोटी कागदपत्रे सादर करून सर्वांचीच फसवणूक केली. अखेर डॉक्टरांनी शनिवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात चार ते पाच डॉक्टरांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे; पण ही संख्या 20 ते 25 असून फसवणुकीचा आकडाही कोट्यवधींच्या घरात असण्याची शक्यता आहे.