Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Kolhapur › मन-आत्मा शुद्ध तरच शरीर तंदुरुस्त! : डॉ. सतीश गुप्ता 

मन-आत्मा शुद्ध तरच शरीर तंदुरुस्त! : डॉ. गुप्ता 

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:51AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

शरीर, मन आणि आत्मा यांच्या योग्य समन्वयातून हृदयरोगासह अनेक आजारांवर मात करून तंदुरुस्त राहणे सहज शक्य आहे, असे जागतिक कीर्तीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता यांनी रविवारी सांगितले. 

पोटात एक आणि ओठात दुसरेच ठेवले की, मनामध्ये पवित्रता राहत नाही आणि अशुद्ध मन चिंतेला कारणीभूत ठरून आत्मा असंतुष्ट राहतो, असे सांगून आनंदी आणि निरोगी जीवनासाठी दुसर्‍यावर निरपेक्ष प्रेम करीत, त्यांची काळजी घेत समाधान मिळविले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘डॉक्टर्स डे’निमित्त दै.‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. दै.‘पुढारी’ व्याख्यानमालेचे हे 15 वे वर्ष आहे.

येथील मार्केट यार्ड परिसरातील राजर्षी शाहू सांस्कृतिक सभागृहात श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीला मार्गदर्शन करीत डॉ. गुप्ता यांनी निरोगी आणि आनंदी जीवनाचे अनेक पैलू सहज व सोप्या भाषेत मांडले. ‘सर्वांगीण आरोग्याची त्रिमिती’ या विषयावर डॉ. गुप्ता यांनी शरीर, मन आणि आत्मा यांचा आजाराशी जवळचा संबंध कसा आहे, हे सांगून श्रोत्यांना तब्बल तीन तास खिळवून ठेवले. माणसाची जडणघडण त्रिमिती सूत्रावर झाली असून, त्यात शरीराची शुद्धता, मनाची पवित्रता आणि आत्म्याची संतुष्टता अत्यंत महत्त्वाची असून, या तिन्हींच्या संगमातून प्रत्येक आजारावर सहजपणे मात करणे शक्य असल्याचे डॉ. गुप्ता यांनी विषद केले.

आत्मा, शरीर आणि मन या त्रिसूत्रीवर मनुष्य संचलन करीत असतो. गर्भ वाढताना त्यामध्ये जनुकीय बदल होत असतानाच काही विशिष्ट अवयवांचे आजार होत असतात. त्यावेळी संबंधित विशिष्ट अवयवांवरील व्याधीचा शोध घेणे आवश्यक आहे, असे सांगून ते म्हणाले, अलीकडे 30 ते 40 वयोगटातील तरुणांनाही हृदयरोगाचा धोका वाढला आहे. याची कारणमीमांसा पाहता गर्भातील जनुकीय बदलाशी त्याचा संबंध जोडला जातो. गेल्या 30-40 वर्षांपासून माणसाची जीवनशैली बदलली आहे. खाण्या-पिण्यातील सवयींबरोबरच व्यायामाचा अभाव, अवेळी झोपणे, सतत ताण आणि तणावाखाली वावरणे, दुसर्‍याबद्दल चांगले विचार न ठेवणे, द्वेष भावनेने वागणे आणि एकमेकांना पाण्यात पाहणे यासह अनेक बाबींचा समावेश आहे. त्यातूनच रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, दमा, अर्धशिशी, पित्त, लठ्ठपणा, अतिकोलेस्ट्रॉल, पाठदुखी, चिंतारोग, बद्धकोष्ठता, प्रवाहिका (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम), यासह अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. त्यावर त्रिमितीय उपचार पद्धतीद्वारे नियंत्रण मिळविता येते.

एकमेकांशी सौदार्हपूर्ण आणि चांगल्या भावनेने वागल्यास मनातील अशुद्ध विचार निघून जातील आणि आजार समूळच नष्ट होतील, असे सांगून डॉ. गुप्ता म्हणाले, बदलत्या जीवनशैलीत केवळ आहार, विहार आणि व्यायाम यांचा अभाव नसून, चांगल्या विचारांचीही दरी निर्माण झाली आहे. ही दरीच माणसाला माणसापासून दूर नेत असून, त्यातून निर्माण होणार्‍या ताणतणावालाही खतपाणी घातले जात आहे. हे टाळणे आज काळाची गरज आहे. 1970 च्या सुमारास हृदयविकाराचे जेवढे रुग्ण होते, त्यांचे प्रमाण पाहता 2020 पर्यंत 300 टक्यांनी वाढ झालेली असेल. गेल्या 50 वर्षांतील ही वाढ पाहता भविष्यात आणखी किती धोका पत्करायचा, याचा विचार आजच्या पिढीने करण्याची गरज आहे. आजची पिढी जर शरीर, मन आणि आत्मा यांच्या शुद्धतेची सांगड घालून विचारात बदल केले, तर त्याचा फायदा पुढील अनेक पिढ्यांना होणार आहे.

डॉ. गुप्ता म्हणाले, 1960 पर्यंत केवळ एक टक्के उच्चभ्रू समाजातील लोकांना हृदयरोगाचा झटका येत होता. परंतु, 1990 दशकापासून मध्यम व कनिष्ठ वर्गातील 40 पेक्षा कमी वयोगटातील लोकांनाही हृदयरोगाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. मोठ्या रुग्णालयात एमआरआय, सिटीस्कॅन, पेटस्कॅनसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मॉडर्न हेल्थ केअरद्वारे शरीराची चिकित्सा केली जाते. औषधे व फिजिओथेरपी उपचार शरीरासाठी मर्यादित असून, याच्या माध्यमातून केवळ शरीरावर उपचार केले जातात. परंतु, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मनाबाबत काहीच शिकविले जात नाही. सध्याच्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, देशात जेवढी रुग्णालये आहेत ती पुरतील का आणि सध्याच्या लाखो रुग्णांवर बायपाससह विविध शस्त्रक्रिया करणे शक्य आहे का, असा प्रश्‍न डॉ. गुप्ता यांनी उपस्थित केला.

उपचाराची साधने आणि वैद्यकीय सुविधांची उपलब्धता पाहता, सध्याच्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आजार जडणारच नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या वर्तणुकीबरोबरच समाजाप्रीत्यर्थ चांगली भावना ठेवणे आवश्यक आहे. स्वतःची दिनचर्या बदलण्याबरोबरच सामाजिक भान म्हणून इतरांनाही जागृत करण्याची आवश्यकता आहे. असे सामाजिक बदल घडले, तर समाजाचे आरोग्य उत्तम राहील. समाजात 95 टक्के रोग हे तणावातून उत्पन्न होतात. 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक असलेले शरीर निरोगी असते, अशी व्याख्या केली आहे. बर्‍याच आजाराचे जीन्स जन्मापासून शरीरात असतात. बहुतांश लोकांना हृदयविकाराची सुरुवात वयाच्या पाचव्या वर्षापासून सुरू होऊन वयाच्या 40 वर्षांत हृदयरोग होतो, ही परिस्थिती आहे.

1977 मध्ये अल्मार्टा येथे जगातील दोनशे देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यात जगाला 2000 सालापर्यंत निरोगी ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु, अद्याप हे शक्य झालेले नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या मोठ्या शहरातील निवडक लोकांचा सर्व्हे करण्यात आला. यात 100 पैकी 30 उच्च रक्तदाब, 14 हृदयरोग, 10 मधुमेह, 25 अ‍ॅसिडिटी, 20 हाडांचे आजार, 10 कॅन्सर, 5 मायग्रेन, 10 इन्फेक्शनचे रुग्ण आढळले आहेत. शंभर लोकांना दोनशे आजार अशी स्थिती असून, प्रत्येक व्यक्तीस दोन रोग असा आरोग्याचा नवा स्टेटस् सिम्बॉल बनला आहे. भारतात 30 टक्के हृदयरोगाशी संबंधित रुग्ण आहेत. नेहमी तणावात राहणे, दुसर्‍यांमध्ये दोष शोधणे, असा स्वभाव खतरनाक आहे. भीती, आळस, अहंकार, चिंता, नैराश्य यामुळे हृदयरुग्ण वाढले आहेत. नकारात्मक विचार, भावना यामुळे शरीरात वेगळ्या प्रकारचे रसायन तयार होते.

ऑस्ट्रेलियासारख्या देशात 25 टक्के लोक हे नैराश्याचे ग्रासलेले असून घराघरांत वाद होत आहेत. भारतात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली असून, प्रत्येक जण पुढे जाण्यासाठी लढत आहे. जगात आज गरीब-श्रीमंत कोणीच सुखी नाही. यासाठी मन व बुद्धी शुद्ध ठेवण्याबरोबरच सरळ स्वभाव, दुसर्‍यांना गोड बोलणे, समजून घेणारा समाधानी असतो.

नुकत्याच 2015 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 62 टक्के लोकांना हृदयाचा झटका आला होता. अमेरिकेमध्ये 2006-07 मध्ये 20 लाख लोकांपैकी 13 लाख लोकांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. यावर सरकारने सुमारे 104 मिलियन डॉलर खर्च केले. वर्षात 29 लाख लोकांचा हृदयरोगाने मृत्यू झाल्याची देशात नोंद आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी देशात मोठी रुग्णालये आहेत का, याचा विचार झाला पाहिजे. स्पेसमेकर, स्टेन्ट, हार्ट ट्रान्सप्लांटसारख्या आधुनिक पद्धतीची गरज आहे. हृदयरोगापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी जीवनशैली बदलणे महत्त्वाचे आहे. आहारात फळे, पालेभाज्या यांचा समावेश असावा. मोकळी हवा, लवकर झोपणे व उठणे, ध्यानधारणा करणे हे सर्वात चांगले उपाय आहेत, असे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

शरीरातील मेंदू हा कॉम्प्युटरच्या भाषेत एक हार्डवेअर आहे. मानवी मन हे त्याचे सॉफ्टवेअर असून, ते कधीच दिसत नाही. प्रत्येक विचार म्हणजे एक कंपण आहे. असे हजारो विचार एकत्र आल्यानंतर भावना तयार होते. चुकीचे विचार, भावना, आठवणी या सर्व गोष्टींमुळे मेंदूमधील हायपोथॅलेमसमध्ये न्यूरोपेपटाईड नावाचे संप्रेरक तयार होते व ते रक्तातून शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचविले जाते. त्यामुळे आजारपणाची भावना निर्माण होऊन डिप्रेशन येते. चांगली वृत्ती, भावना, बंधुभाव, प्रेम, आपुलकी ही एक स्वयंशिस्तीचे कार्य करते.

योग्य औषधोपचार, आहार, योग्य व्यायाम व त्याच्या जोडीला ध्यानधारणा ही आनंद निर्माण करणारी संप्रेरके निर्मिती करतात. यामुळे आपले रोग मुक्त होण्यास मदत करतात, असे डॉ. गुप्ता म्हणाले. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप पाटील यांनी स्वागत, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय डी.पाटील, संचालक ऋतुराज पाटील, दै.‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, डॉ. राहुल गुप्ता, डॉ. संजीव कद्दू, डॉ. दिलीप देसाई, डॉ. श्रीकांत लंगडे, डॉ. वरुण बाफना, डॉ.प्रशांत किट्ड, डॉ. जया पाटील, डॉ. विवेकानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

निरोगी आरोग्यासाठी टिप्स...

 दररोज 35 मिनिटे चालावे
• चालताना बोलणे टाळा
• रात्री 10 ते 4 या वेळेत पुरेशी झोप घ्या
• शुद्ध शाकाहारी, सात्विक आहार घ्या
• चिडचिड टाळा
• व्यसनमुक्त रहा
• नियमित ध्यानधारणा करा
• सकारात्मक विचार, भावना व दृष्टी ठेवा
• मोबाईल शर्टच्या खिशामध्ये ठेवू नका
• ऑफिस व घरामध्ये लँडलाईनचा वापर करा
• फळे व पालेभाज्या दोन तास पाण्यात ठेवा

सभागृह हाऊसफुल्ल

दै.‘पुढारी’ आणि डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर्स डे’निमित्त श्री शाहू सांस्कृतिक भवन हॉल मार्केट यार्ड येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता यांचे व्याख्यान झाले. नागरिकांनी व्याख्यानास उपस्थिती लावली. नागरिकांच्या उपस्थितीमुळे सभागृहात अलोट गर्दी झाली होती. काही जणांनी व्यासपीठ व काहींनी उभे राहून व्याख्यानाचा लाभ घेतला.