Wed, Apr 24, 2019 16:31होमपेज › Kolhapur › प्रादेशिक आराखड्याबाबत चिंता नको

प्रादेशिक आराखड्याबाबत चिंता नको

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 04 2018 10:49PMगडहिंग्लज : प्रतिनिधी

प्रादेशिक विकास आराखड्याच्या बाबतीत किसान संघाने उपस्थित केलेल्या त्रुटींवर मंत्रालयातून पुढील प्रक्रिया सुरू आहे. याबाबत कोणीही चिंता करू नये, सर्वांची बाजू ऐकून घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही महसूल व पुनर्वसनमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी भारतीय किसान संघाच्या पदाधिकार्‍यांना दिली.

प्रादेशिक विकास आराखड्यातील विविध त्रुटींबाबत दि. 20 फेबु्रवारी  रोजी महसूल व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासोबत किसान संघाची मंत्रालयात बैठक झाली होती. या बैठकीत किसान संघाने  आराखड्यातील त्रुटींमुळे होणार्‍या नुकसानीची माहिती दिली होती. यानंतर नगररचना संचालक (पुणे) यांच्यासोबत तीन तज्ज्ञ अधिकार्‍यांची समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील 5,390 हरकतींवर फेरसुनावणीचा निर्णय घेऊन बाधित क्षेत्रातील लोकांना म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली होती.

यानंतर मात्र काही वृत्तांमुळे याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. या पार्श्‍वभूमीवर बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे एका कार्यक्रमासाठी ना. पाटील आले असता, किसान संघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी बोलताना ना. पाटील यांनी प्रादेशिक आराखड्यातील त्रुटींबाबत सकारात्मक भूमिका मांडली. यावेळी  किसान संघाचे तालुकाध्यक्ष बाळगोंडा पाटील, रामभाऊ पाटील, उमाशंकर मोहिते, अशोक कमते, मलगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

...अशा होत्या प्रमुख त्रुटी

जिल्हा प्रादेशिक नगररचना आराखड्यामध्ये विद्यमान स्थितीचा सर्व्हे न केल्याने सुमारे 410 घरे, नागरी वसाहती, 18 देवालये, श्रद्धास्थाने, 38 विहिरी, 206 एकर जमीन नष्ट होऊन एकंदरीत 1,155 कुटुंबे विस्थापित होण्याची शक्यता होती. गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी नदीच्या पूररेषेत रस्ता प्रस्तावित आहे. त्यामुळे गंभीर स्थिती उद्भवणार होती. कोल्हाटी, डोंबारी समाजाची पुनर्वसित वसाहत उद्ध्वस्त होऊन 100 भटके कुटुंबे देशोधडीला लागणार होती. सैन्य दलातील जवानांच्या एन.ए. प्रमाणित कॉलन्यांमध्ये पूर्णपणे रस्ता होणार नसल्याने रहदारीचा प्रश्‍न, केदारलिंग व हाळलक्ष्मी देवालयेही अस्तित्वहीन होणार होती. अशा 5,390 हरकती उपस्थित करण्यात आल्या आहेत.