होमपेज › Kolhapur › टोलवाटोलवी नको, समन्वयाने काम करा

टोलवाटोलवी नको, समन्वयाने काम करा

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 12:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जोतिबा विकास आराखडा मंजूर झाला आहे. पहिल्या टप्प्यात पाच कोटींचा निधी आला आहे. त्यातून दर्शन मंडप व टॉयलेट कॉम्प्लेक्सचे काम केले जाणार आहे. मात्र, त्याकरिता आवश्यक मंजुरी घेतली नाही. त्याकरिता टोलवाटोलवी केली जात आहे. ती बंद करा आणि समन्वयाने काम करा, असे सुनावत ही सर्व प्रक्रिया जुलैअखेर पूर्ण करा, अशी सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली.
श्रीक्षेत्र जोतिबा विकास आराखडा व श्री महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जोतिबा विकास आराखड्याअंतर्गत 25 कोटींच्या आराखड्यास शासनाने मान्यता दिली असून, यापैकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून श्री क्षेत्र जोतिबा येथे दर्शन मंडप व पुरुष व महिला प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहे. मात्र, आराखड्यात असणारा रस्ता मोजणीच्या दाखल्यात दिसत नाही. या रस्त्याचे वर्गीकरण करण्याची गरज आहे. हे काम कोणी करायचे, याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे. यामुळे या कामाला मंजुरी मिळालेली नाही. त्यावर डॉ. म्हैसेकर यांनी या कामासाठी तत्काळ मंजुरी घेऊन जुलैअखेर त्याची टेंडर प्रक्रिया राबवा, अशी सूचना केली. श्री महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदिर परिसर विकास आराखड्याबाबत सविस्तर अंदाजपत्रके तयार करा. ती तांत्रिक मान्यतेसह नगर विकास विभागाला तत्काळ सादर करण्याची सूचना डॉ. म्हैसेकर यांनी केली. या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्याबाबत आवश्यक उपाययोजना प्राधान्याने केल्या जातील.

याकामी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून या दोन्ही तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या कामास सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, पश्‍चिम देवस्थान समितीचे सचिव विजय पवार, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, पोलीस उप अधीक्षक सूरज गुरव आदी उपस्थित होते.