Thu, Jul 18, 2019 16:30होमपेज › Kolhapur › स्टंटबाजीसाठी अंबाबाईच्या धार्मिक स्थळाचा वापर करू नये

स्टंटबाजीसाठी अंबाबाईच्या धार्मिक स्थळाचा वापर करू नये

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 12:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी गर्भकुटीत सोवळे नेसून जाणे ही धार्मिक परंपरा आहे. तरीही सोवळे न नेसता जाणे म्हणजे धार्मिक रुढी, परंपरा बिघडविण्याचा प्रकार आहे.कोणीही प्रसिद्धी व स्टंटबाजीसाठी श्री अंबाबाईच्या पवित्र धार्मिक स्थळाचा वापर करू नये, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना श्री अंबाबाईच्या मंदिरातील गर्भकुटीत विना सोवळे जाता येणार नाही, असे देवस्थानचे कर्मचारी व श्रीपूजकांनी सांगितले होते. तरीही त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांना रोखण्यात आले. दुपारी बारा वाजता देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते, आरती झाल्यानंतर श्रींच्या दर्शनासाठी गर्भकुटीत चार पिठांचे शंकराचार्य आणि छत्रपती घराण्यातील व्यक्ती यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. ही बाब श्रीपूजक आणि देवस्थान समिती यांच्याकडून अत्यंत काटेकोरपणे पाळली जात आहे. तसेच मंदिराची परंपरा, पावित्र्य, धार्मिकता याबाबी अबाधित राहिल्या पाहिजेत, असे समितीचे  स्पष्ट  मत आहे.