Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Kolhapur › संयमाचा अंत पाहू नका...

संयमाचा अंत पाहू नका...

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:44PMकोल्हापूर : प्रतिनिधी

केंद्र शासनाप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करा, जुनी पेन्शन योजना सुरू करा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. सरकार मात्र, दरवेळी आश्‍वासन देत आहे. सरकारने आता आमच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिला. ऑगस्ट महिन्यात तीन दिवसांचा लाक्षणिक संप केला जाईल, त्यानंतर केव्हाही बेमुदत संपावर जाऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विविध मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महानिदर्शने’ करण्यात आली. शहरात विविध नऊ ठिकाणी दिवसभर आंदोलन करत ‘निषेध दिन’ पाळण्यात आला.

अंशदायी पेन्शन योजना रद्द करा आणि कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, एक जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करा, खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करा, कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करा, पाच दिवसांचा आठवडा करा, सेवानिवृत्तीचे वय 60 करा, महिला कर्मचार्‍यांना दोन वर्षांची बाल संगोपन रजा द्या, सर्व रिक्त पदे त्वरीत भरा व अनुकंपा भरती विनाअट चालू करा या मागण्यासाठी संघटनेने दि.18 ते दि.20 जानेवारी 2017 रोजी व दि.12 ते 14 जुलै 2017 रोजी संप पुकारला होता. सरकारच्या चर्चेनंतर ते स्थगित करण्यात आले होते. 22 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात आलेला विराट मोर्चाही चर्चेनंतर स्थगित करण्यात आला होता. या गोष्टीचे सरकारला वारंवार स्मरणही करून दिले जात आहे. तरीही सरकारने चर्चेला वेळ दिलेला नाही, निर्णय घेतलेला नाही.

सरकारच्या निषेधार्थ राज्यभर आज आंदोलन करण्यात आले. सकाळी सीपीआर हॉस्पिटल येथे निदर्शने झाली. यानंतर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विक्रीकर भवन, शासकीय तंत्रनिकेतन, जलसंपदा विभाग, आय.टी.आय., शासकीय मुद्रणालय, शिक्षण उपसंचालक कार्यालय या ठिकाणी निदर्शने झाली. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महानिदर्शने’ करण्यात आली. सरकार केवळ आश्‍वासने देत आहेत. मात्र, आमचा शांततेच्या मार्गाने लढा सुरूच आहे. मागण्या मान्य होत नसल्याने त्याचा कर्मचार्‍यांना फटका बसत आहे. यामुळे सरकारने मागण्या तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करू, ऑगस्टमध्ये तीन दिवसांचा संप करू, त्यानंतर मात्र, कोणत्याही क्षणी बेमुदत संपावर जाऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

मध्यवर्ती संघटनेचे सहसचिव अनिल लवेकर, जिल्हाध्यक्ष वसंत डावरे, कार्याध्यक्ष सुनील देसाई, महसूल कर्मचारी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष विलास कुरणे, संजय क्षीरसागर, नितीन कांबळे, भरत काळे, नितीन कांबळे आदींसह विविध विभागांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते.