Thu, Apr 25, 2019 05:33होमपेज › Kolhapur › भाजपची बिमारी पुन्हा येऊ देऊ नका

भाजपची बिमारी पुन्हा येऊ देऊ नका

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 1:01AMइचलकरंजी : प्रतिनिधी  

मोदी सरकारच्या काळात 45 हजारांहून अधिक आत्महत्या झाल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे व्यापारी, शेतकरी, सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. रोजगार, नोकर्‍या उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात जनतेला देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. ‘एक ही भूल..कमल का फूल’ हे जनतेला समजले आहे. त्यामुळे  भाजपची बिमारी परत येऊ देऊ नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. येथील ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

अशोक चव्हाण म्हणाले, निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने आश्‍वासनांची खैरात केली.  या सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. सरकार चालवता येत नाही. वस्त्रोद्योगाची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. सरकारच्या विश्‍वासघातकीपणामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरला जाता आले नाही. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. विकासाची संकल्पना राबवयाची असेल तर काँग्रेसशिवाय देशाला पर्याय नाही. परिवर्तनाची भूमिका कोल्हापूर जिल्ह्यातून सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात परिवर्तन होणार असून, महाराष्ट्रातून सर्वांत जास्त आमदार निवडून येतील, असा आशावादही त्यांनी व्यक्‍त केला. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी आत्मविश्‍वास गमावला आहे. त्यामुळे मशिनमध्ये काय करता येईल का, हा पर्याय ते शोधत आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांतील त्यांचे मूल्यमापन करावे लागेल. घटना संपवण्याचा डाव या सरकारचा आहे. त्यामुळे पुन्हा मोदी सरकारला निवडून दिल्यास पुन्हा निवडणूक नाही, लोकशाही नाही, संविधान नाही तर छत्रपती शाहू महाराजांचा विचारही शिल्लक राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली. 

आ. सतेज पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या मनात, घरात काँग्रेस आहे. ते डोक्यात आणि हृदयापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कर्तृत्वशून्य आणि दंगलीचा फायदा घेऊन निवडून आलेल्या विद्यमान आमदारांनी इचलकरंजीसाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला. 

माजी आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, यंत्रमाग व्यवसाय वीज दरात सवलत, व्याजात 5 टक्के अनुदान दिले म्हणून  साखर वाटली. प्रत्यक्षात मात्र यंत्रमागधारकांना काहीच मिळाले नाही. साधे यंत्रमाग गोठवून आधुनिकीकरणीचा घाट घालून छोटा यंत्रमागधारक, कामगार मोडीत काढण्याचा डाव सरकारचा आहे. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाणा आवाडे, माजी मंत्री जयवंतराव आवळे,  महिला प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, माजी आमदार डी.पी.सावंत, गणपतराव पाटील, आ. विजय वडेट्टीवार, शहराध्यक्ष प्रकाश मोरे, जि. प. सदस्य राहुल आवाडे, पं. स. सदस्य महेश पाटील, नगरसेवक शशांक बावचकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा रात्री उशिरा सांगलीत पोहोचली. तेथेही भाजप व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर नेत्यांनी जोरदार टीका केली.