Thu, Apr 25, 2019 21:23होमपेज › Kolhapur › लाचखोरांना प्रतिष्ठा देऊ नये!

लाचखोरांना प्रतिष्ठा देऊ नये!

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 25 2018 11:03PMकोल्हापूर : विजय पाटील 

दिमतीला अलिशान वाहने.जाईल त्या शहरात बंगले. जमीनजुमला जोडीला वाढतोच आहे. एखाद्या धनाढ्य माणसाचे बिघडलेले पोरगे जसे वागते तशा पद्धतीचे ऐय्याश जगणे. हे सगळे चित्र बघायला मिळते ते अनेक सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बाबतीत. मुळात हा सगळा लाचखोरीचा पुरावा आहे, हे समोरच्यांना माहीत असते; पण अपवाद सोडला तर अशा लाचखोरांना काहीजण गरज नसताना मानसन्मान देतात.  मुळात या लाचखोरांनी मान खाली घालून वागायला हवे असताना ही मंडळी मस्तवाल आणि सेलिब्रिटीसारखे वावरताना दिसतात. 

.लाचखोरी फोफावण्यामागे जी काही कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे अशा लाचखोरांना गरज नसताना प्रतिष्ठा दिली जाते. ही मंडळी आपले पाप लपवण्यासाठी सामाजिक मदतीचा आव आणतात. अनेकांच्या अडीनडीला आर्थिक मदत करतात. त्यामुळे अशांबद्दल उगीचच कणव बाळगणारा एक मिंदा वर्ग असतो. हा मिंदा वर्ग लाचखोरांच्या प्रतिष्ठेचे ढोल वाजवत राहतो. त्यामुळेच ही मंडळी निर्ढावल्यासारखे दिसेल त्याच्यावर गुरगूरत असतात. पूर्वी सरकारी बाबूंना सरकारी नोकर म्हटले जात असे. आता मात्र यामध्ये बदल करून जनतेचे सेवक असे कायद्याने व्याख्या करण्यात आली आहे. म्हणजेच हे जनतेचे सेवक असतानाही काहीजण नेमलेले काम करत नाहीत. ‘जेथे लाच तेथेच काम’ असे सूत्र घेऊन काही मंडळी कार्यरत असतात.

लाच घेणार्‍यांची नावे सगळ्यांना माहिती असतात. कारण, अमूक एक साहेब खिसा गरम केल्याशिवाय सहीच करत नाही, अशी चर्चा खुलेआम असते. असे असताना अशांना उगीचच काहींकडून प्रतिष्ठा देण्याचे पाप घडते. अशांना लोकांनी टाळायला हवे. लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी सामाजिक संस्था व सर्वसामान्यांकडून अलीकडे जोर धरू लागली आहे. कारण रंगेहाथ पकडलेल्यांना निलंबित जरी केले असले तरी काही महिन्यानंतर हे चेहरे पुन्हा सेवेत मेवा खात असल्याचे दिसते. त्यामुळे अशांना बडतर्फ करावे, अशी मागणी सुरू झाली आहे.  

खासगी आस्थापनासाठीही कायदा उपयोगी 

खासगी क्षेत्रात लाचखोरी मूळ धरु लागली आहे. त्यामुळेच सरकारने नुकताच खासगी आस्थापनासाठी लाचखोरीसाठी कायदा केला आहे. या कायद्यान्वये आता खासगी क्षेत्रातही लाच देणे व घेण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल होऊन शिक्षा होणार आहे. उद्योग क्षेत्रात पर्चेस ऑफिसर यासारख्या पदांवर असणार्‍यांकडून लाचखोरी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात वाढत चाललेल्या लाचखोरीलाही आळा बसेल, असे मानायला हरकत नाही.