Tue, Apr 23, 2019 00:20होमपेज › Kolhapur › फेरीवाल्यांचे निर्मूलन नको, नियोजन करा

फेरीवाल्यांचे निर्मूलन नको, नियोजन करा

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:20AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्यांचे निर्मूलन नको, नियोजन करा, शहरात राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजाणी करा, या प्रमुख मागण्यांसाठी कोल्हापूर शहर/जिल्हा सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या वतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. व्यवसाय बंद ठेवून मोठ्या संख्येने फेरीवाले मोर्चात सहभागी झाले होते. महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त श्रीधर पाटणकर यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदन स्वीकारले. 

आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी हे प्रशिक्षणासाठी परगावी गेले आहेत, तिकडून परत आल्यानंतर त्यांच्याशी फेरीवाल्यांची बैठक घडवून आणू. तसेच ज्या केबिन वाहतुकीला अडथळा निर्माण करत आहेत, अशा केबिन हटविण्यात येतील. मात्र, जे कार्डधारक आहेत, अशा केबिन्सना न हलविण्याच्या सूचना अतिक्रमण निर्मूलन पथकाला दिल्या जातील, असे आश्‍वासन पाटणकर यांनी दिले. सुभाष वोरा, कॉ. दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेअकराच्या सुमारास शिवाजी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. माळकर तिकटीवरून हा मोर्चा महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणण्यात आला. ‘मागतो आम्ही हक्‍काचं, नाही कोणाच्या बापाचं’, ‘कायद्याची पायमल्‍ली करणार्‍यांचा धिक्‍कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

कॉ. रघुनाथ कांबळे म्हणाले, आम्ही फेरीवाले असून, रस्त्यावर उभे राहून व्यवसाय करत आहोत. महापालिकेने जर आम्हा फेरीवाल्यांच्या हातातील काम काढून घेतले, तर आमचे रिकामे हात काय करतील, हे सांगता येणार नाही. कॉ. पवार म्हणाले, मनपाने फेरीवाला कायद्याची अंमलबजाणी करावी. 

महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत रस्त्यावर व्यवसाय करणार्‍या पथविक्रेत्यांना व किरकोळ व्यावसायिकांना लक्ष्य केले जात आहे. या कारवाईमुळे शहरात परंपरागत व बायोमेट्रिक कार्डधारक फेरीवाले विस्थापित होत आहेत. फेरीवाल्यांच्या प्रश्‍नांवर यापूर्वी अनेक बैठका झाल्या; पण कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. तेव्हा शहरातील सर्व फेरीवाल्यांचा सर्व्हे झाल्याशिवाय एकही केबिन्स हटवू नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या मोर्चात समीर नदाफ, तय्यब मोमीन, संतोष आयरे यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते.