Tue, Mar 26, 2019 11:43होमपेज › Kolhapur › लुडकणार्‍या गाडीला दिव्यांगांचा आधार

लुडकणार्‍या गाडीला दिव्यांगांचा आधार

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:00PMकोल्हापूर : पूनम देशमुख

गाव असो वा शहर व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेली मुले पाहायला मिळतात तर काही जण उच्चशिक्षित होऊन मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून धडधाकट असूनही आई, वडिलांच्या कमाईवर सुखवस्तू जीवन भोगत असतात. त्या मुलांसाठी फुलेवाडी येथील महेश सुतार यांच्या गॅरेजमधील मुले आदर्शवत आहेत.  दिव्यांग असतानाही आपल्या व्यंगाचे भांडवल न करता ते स्वावलंबी बनले आहेत. एकूणच ही परिस्थिती पाहता हे दिव्यांग तरुण समाजाला आदर्श वाट दाखवत आहेत.

महेश सुतार यांचा लहान भाऊ  सुजित दिव्यांग आहे, नोकरी करत असताना त्याच्याकडे दुर्लक्ष होत होते.  भावाकडे लक्ष देता यावे म्हणून सुतार यांनी नोकरी सोडून गॅरेज व्यवसाय स्वीकारला. गॅरेजमधील स्वप्निल साळोखे हा दिव्यांग मुलगा सकाळी कॉलेज करून त्यानंतर हा पार्टटाईम जॉब करत कुटुंबाला हातभार लावतो आहे. या मुलांना महेश सुतार यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. एकमेकांसोबत हातवारे करत सांकेतिक भाषेत ग्राहक आणि आपापसांत संवाद करतात. गॅरेजमधील गाडी धुण्यापासून ते पंक्‍चर काढण्यापर्यंतची सर्व कामे ही मुले अगदी सर्वसामान्य व्यक्‍तींप्रमाणेच करतात. प्रसंगी तिरस्कार वाटणार्‍या या मुलांचा आज पालकांना अभिमान वाटतो आहे. 

प्रेमाचा उपचार ठरला प्रभावी

समाजात दिव्यांग मुलांकडे उपहासात्मक पाहिले जाते.  कुटुंबातही अनेकदा त्यांना तिरस्काराचा सामना करावा लागतो, अशावेळी महेश सुतार यांनी केलेला प्रेमाचा उपचार प्रभावी ठरला. त्यांनी या मुलांना स्वावंलबी बनवले. आज ही मुले आत्मविश्‍वासपूर्वक गॅरेजमधील सर्व काम करतात. इतकेच नव्हे तर पालकांशिवाय शहरातून एकट्यानेच प्रवास करतात. मुलांमधील झालेला हा बदल पालकांसाठी सुखावह आहे, महेश सुतार हे दिव्यांगांसाठी गॅरेज सुरू करणारा अवलिया ठरला आहे.