Mon, Mar 25, 2019 05:02
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › सरपंचांनी टक्केवारीपासून रहावे दूर : दळवी

सरपंचांनी टक्केवारीपासून रहावे दूर : दळवी

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सरपंचांनी उच्च प्रतीची नैतिकता अंगी बाळगून टक्केवारीपासून  दूरच राहिले पाहिजे, अशी अपेक्षा पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदेतर्फे सरपंच व ग्रामसेवकांकरिता स्मार्ट ग्राम योजना प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा व यशवंत सरपंच, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार यांचे वितरण अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक होत्या. 

दळवी म्हणाले, सरपंचांनी निरपेक्ष, नि:पक्षपातीपणे व राजकारण विरहित काम केले पाहिजे. गावच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणण्याची, सामावून घेण्याची जबाबदारी सरपंचांची असते. त्याच्यावरच विकासकामातील जनसहभागाचा पाठिंबा अवलंबून असतो.  सरपंचांनी सांडपाणी घनकचरा यांची निर्गत करून गाव हागणदारीमुक्त केले पाहिजे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी ग्रामपंचायतींना 14 व्या वित्त आयोगानुसार 500 कोटी रुपयांहून अधिक निधी मिळणार आहे. त्यामुळे 80 ते 90 टक्के प्रश्‍न त्या-त्या गावातच सुटू शकतात, असे सांगितले.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अमरीश घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, इंद्रजित देशमुख, पाटोदा (जि. औरंगाबादचे)चे सरपंच भास्करराव पेरे-पाटील, शुभांगी शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामसेवकांच्या पळापळीला लगाम

ग्रामसेवक गावात नसल्याची अनेकदा तक्रार होते. त्यामुळे आता ग्रामसेवकाला सारखे पंचायत समितीमध्ये मिटिंग अथवा कामांच्या पाठपुराव्यासाठी जावे लागणार नाही. महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या सोमवारीच पंचायत समितीत ग्रामसेवकांच्या बैठका होतील. उर्वरित दोन सोमवारी कामांचा पाठपुरावा करावयाचा आहे. त्यामुळे ग्रामसेवकाची ग्रामपंचायतीत उपस्थिती राहणार असून याबाबत त्याला मनमानी करता येणार नाही. याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.