Tue, Jul 23, 2019 07:11होमपेज › Kolhapur › जिल्हा बँका भरती ऑनलाईन

जिल्हा बँका भरती ऑनलाईन

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 1:19AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हा मध्यवर्ती बँकांतील अवास्तव व गुणवत्ता न पाहता होणार्‍या नोकरभरतीला शासनाने चाप लावला आहे. यापुढे या बँकांतील भरती ऑनलाईन पद्धतीनेच करण्याचे आदेश आज शासनाने काढले. सहकार विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांच्या सहीने हे आदेश निघाले. 

जिल्हा बँकांतील आकृतीबंधाला नाबार्ड मान्यता देते, त्यानंतर सहकार आयुक्‍तांच्या परवानगीने नोकरभरती करण्याची पद्धत होती. काही बँकांत अशा भरतीबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्‍त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने भरतीसंबंधी आदेश दिले आहेत. 

ऑनलाईन नोकरभरतीसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्‍ती करावी लागणार आहे. ही संस्था नोंदणीकृत असली पाहिजे. या संस्थेने यापूर्वी किमान पाच राष्ट्रीयीकृत्त बँका किंवा खासगी बँका अथवा शासनाच्या विभागातील भरती प्रक्रिया राबवलेली असली पाहिजे. बँकेच्या गरजेनुसार आवश्यक नोकरभरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ असलेल्या संस्थेची निवड करावी लागणार आहे. भरतीची जाहिरात देण्यापासून ते अंतिम प्रक्रिया पूर्ण करण्यापर्यंतची जबाबदारी या संस्थेची राहील, असे आदेशात म्हटले आहे. 

या संस्थेच्या निवडीला संचालक मंडळाची मान्यता देणे, संस्थेची निवड बँकेनेच केल्याने त्यासंदर्भात वाद झाल्यास त्याची कार्यवाही बँकेलाच करावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेत भ्रष्ट मार्गाचा अवलंब किंवा दबावाचा वापर झाल्यास ही प्रक्रिया रद्द ठरवण्यात येणार आहे. मुलाखत घ्यावी लागणारी व न घ्यावी लागणारी पदे अशा दोन्ही भरतीसाठी वेगवेगळे नियमही या आदेशात दिले आहेत. एकूण जागांच्या 20 टक्के उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करून त्यातून अंतिम निवड करावी लागणार आहे. अशा उमेदवारांची ऑनलाईन मुलाखतही संस्थेला घ्यावी लागणार आहे. त्याची तारीख, वेळ व ठिकाणाची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. एका दिवसात केवळ 100 जणांचीच मुलाखत घेता येणार आहे.