Fri, Jul 19, 2019 07:09होमपेज › Kolhapur › जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख यांची डॉ.जाधव यांच्याशी चर्चा

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.देशमुख यांची डॉ.जाधव यांच्याशी चर्चा

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्याचे नूतन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांची मंगळवारी सदिच्छा भेट घेतली. मराठा आरक्षण आंदोलन, कायदा सुव्यवस्थेसह जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर डॉ. देशमुख यांनी डॉ.जाधव यांच्याशी चर्चा केली. दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक व उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. देशमुख यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. आज, दुपारी डॉ. देशमुख यांनी दैनिक ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास भेट दिली. दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री कै.डॉ.ग.गो.जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

‘पुढारी’ परिवाराच्या वतीने डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव यांनी डॉ. देशमुख यांचे स्वागत केले. मराठा आरक्षण आंदोलन,  जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था, शहरासह जिल्ह्यातील वाहतूक नियोजन, पोलिस दलाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या लोकाभिमुख योजनांबाबत डॉ. देशमुख यांनी डॉ. जाधव यांच्याशी तासभर चर्चा केली. जिल्ह्यातील गुन्हेगारी, खासगी सावकारी, तस्करी टोळ्यांना रोखण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याबाबतही पोलिस अधीक्षकांनी डॉ. जाधव यांना माहिती दिली. दैनिक ‘पुढारी’ने समाजातील सर्वच घटकांत आदराचे स्थान निर्माण केले आहे. सामाजिक, विधायक उपक्रम यशस्वीरीत्या राबवून ‘पुढारी’ परिवाराने विश्‍वासार्हतेची विण अधिक घट्ट केली आहे. जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या नात्याने मला अभिमान वाटतो, असेही गौरवोद्गार डॉ. देशमुख यांनी काढले. 

डॉ. जाधव यांच्या हस्ते डॉ. देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल गुजर, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंतराव बाबर आदी उपस्थित होते.