Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Kolhapur › डॉ. प्रतापसिंह जाधव, संयोजकांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मानले आभार

डॉ. प्रतापसिंह जाधव, संयोजकांचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मानले आभार

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 09 2018 11:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक म्हणून चार दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच मराठा आरक्षण आंदोलनाचे मोठे आव्हान सामोरे होते. दैनिक ‘पुढारी’चे  मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यासह सकल मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक, प्रमुख मंडळी, सामाजिक संस्था, सहकारी अधिकारी व पोलिस कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत झाला आहे. त्यामुळे  त्यांचे आभार मानतो, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ‘मूक नव्हे, ठोक मोर्चा’च्या निर्धारामुळे आठ दिवसांपासून तणावग्रस्त बनलेले कोल्हापूर पोलिस दल गुरुवारी सायंकाळी टेन्शन फ्री झाले. कोल्हापूर शहर, इचलकरंजीसह जिल्ह्यात किरकोळ अपवाद वगळता बंद शांततेत झाल्याने वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पावसाच्या सरी अंगांवर झेलत जिल्ह्यातील चार हजारांवर पोलिस रस्त्यांवर होते.

कोल्हापूर येथील मध्यवर्ती दसरा चौकात सतरा दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वाड्यावस्त्यांवरही त्याचे लोण पसरले होते. शिवाय, मूक नव्हे तर, ठोक मोर्चाचा सकल मराठा क्रांतीच्या संयोजकांनी निर्धार केल्याने त्याची कमालीची धास्ती पोलिस यंत्रणेनी घेतली होती.

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, नवे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे, श्रीनिवास घाडगे आठ-दहा दिवसांपासून बंदोबस्ताच्या व्यापक नियोजनात गुंतले होते. शिवाय, जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत सर्व प्रभारी अधिकारीही मराठा समाजाचे स्थानिक पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात राहून बंद शांततेत पाळण्याबाबत आवाहन करीत होते. शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवून सामान्यांना त्रास होणार नाही, याचीही पोलिस यंत्रणेने खबरदारी घेतली होती.

नांगरे-पाटील, डॉ. देशमुख यांची ठिकठिकाणी पाहणी

मुंबई-पुणे महामार्गासह कोल्हापूर शहराला जोडणार्‍या सर्वच मार्गांवर कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी घेत व्यापक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते. विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी आज, सकाळी शहरासह परिसराची स्वत: पाहणी करून अधिकारी, पोलिसांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.

महामार्गावर चोख सुरक्षा व्यवस्था

ठिय्या आंदोलनस्थळ दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी पेठ, बस-रेल्वे स्थानकांसह तावडे हॉटेल, सांगली फाटा, लक्ष्मी टेकडी आदी ठिकाणी बुधवारी रात्रीपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा सज्ज ठेवण्यात आला होता; मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत संवेदनशील ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, असा दावा खुद्द पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

टायरी पेटविण्याचा प्रयत्न

स्टेशन रोडवर सकाळी काही तरुणांनी टायरी पेटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, शाहूपुरीचे संजय मोरे, वसंतराव बाबर आदी अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच तरुण पसार झाले. अधिकार्‍यांनी पाण्याचा मारा करून पेटलेल्या टायरी विझविल्या.

भरपावसात पोलिस रस्त्यांवर!

बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शहरासह करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, भुदरगड, गगनबावडा तालुक्यांतही अधिकारी, पोलिस डोळ्यांत तेल घालून पहारा देत होते. रात्री बारापासून आज सायंकाळपर्यंत पावसाच्या सरी अंगावर घेत अधिकारी, पोलिस ड्युटी निभावत होते.