Wed, Feb 26, 2020 09:06होमपेज › Kolhapur › 'पूरग्रस्त भागात मोफत गणेशमूर्तीं'

'पूरग्रस्त भागात मोफत गणेशमूर्तीं'

Published On: Aug 26 2019 1:47AM | Last Updated: Aug 26 2019 1:47AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. या महापुरात अनेकांचे छत्र हरवले. तर अनेक लघुद्योगही विस्कळीत झाले. गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच स्थानिक कुंभार समाजाने बनविलेल्या सर्वच्या सर्व गणेशमूर्ती पुरात वाहून गेल्या. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा कसा करावा? असा प्रश्‍न जिल्ह्यातील गणेश भक्‍तांसमोर निर्माण झाला होता.  

महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तसेच कुंभार समाजाने ही व्यथा मांडली. देवावरील श्रद्धा आणि जनभावनेची दखल घेत चंद्रकांत पाटील यांनी पहिल्या टप्प्यात 500 गणेशमूर्ती उपलब्ध करून दिल्या आहेत. स्थानिक  कुंभार समाज बांधवांच्या माध्यमातून या मूर्तींचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांच्या प्रसिद्धी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामुळे कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांचे गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाले होते. कुरूंदवाड शहरात गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. येथील मशिदींमध्ये गणपती बसवण्याची परंपरा शंभरहून अधिक वर्षांपासून सुरू आहे. शहरातील तब्बल सात मशिदींमध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या सर्व मशिदींचा परिसर हिंदू-मुस्लिम मिश्र लोकसंख्येचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील हे नागरिक अत्यंत सलोख्याने हे दोन्ही धर्माचे सण एकत्रितरीत्या साजरे करतात. मात्र, यावर्षी कोल्हापुरात महापूर आल्याने येथील कुंभार समाजातील बांधवांनी बनवलेल्या गणेशमूर्ती पाण्यात वाहून गेल्या. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना कुरूंदवाड येथील कुंभार समाजातील बांधवांची समस्या जाणून घेतल्या. या पार्श्‍वभूमीवर चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सहकार्याने 500 गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मूर्ती पेन येथून कुरूंदवाड येथे पोहोचवल्या जात आहेत.