Sat, Apr 20, 2019 10:37होमपेज › Kolhapur › बारावीचे सीलबंद प्रश्‍नपत्रिकांचे थेट वर्गात वाटप

बारावीचे सीलबंद प्रश्‍नपत्रिकांचे थेट वर्गात वाटप

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 1:13AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

बारावीच्या प्रश्‍नपत्रिकांचे गठ्ठे परीक्षा केंद्रात फोडून वर्गनिहाय वितरित करण्याऐवजी यंदा परीक्षा केंद्रात थेट वर्गात सीलबंद प्रश्‍नपत्रिका पाठवून विद्यार्थ्यांच्या हाती दिल्या जाणार आहेत. बोर्डाच्या या निर्णयामुळे परीक्षा केंद्रावरील गैरप्रकारांना आळा बसणार असून कॉपीचे प्रमाण घटण्यास मदत होईल.

दहावी आणि बारावीच्या प्रश्‍नपत्रिका व्हॉटस् अ‍ॅपवर फुटल्याने गोंधळ उडाला होता. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ याची खबरदारी घेत नवीन गोष्टी राबविण्याचा विचार करीत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. 

राज्य मंडळाच्या वतीने यापूर्वी परीक्षा केंद्रावरून प्रश्‍नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. 50, 20 व 10 अशा स्वरूपानुसार ऑड नंबर असलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिकांचे वाटप केले जायचे. यावर्षी केंद्र संचालकांकडून पेपर गठ्ठ्यांचे सीलबंद पाकीट वर्ग पर्यवेक्षकांच्या हातात दिले जाणार आहेत. परीक्षेअगोदर काही मिनिटे दोन विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी घेऊन हे सीलबंद पाकीट फोडले जाईल, यामुळे गैरप्रकार करण्यास वाव मिळणार नाही.

विद्यार्थी संख्या घटली... परीक्षा केंद्रे वाढली
कोल्हापूर विभागात गतवर्षीच्या 1 लाख 32 हजार 222 विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या 1 लाख 29 हजार 950 अशी घटली आहे. मात्र, परीक्षा केंद्रांची संख्या 146 वरून 154 झाली आहे. वाई, सांगली, विटा, आटपाडी, गडहिंग्लज, इचलकरंजी अशी आठ नवीन केंद्रे वाढली आहेत. यावर्षी नव्या निर्णयानुसार 25 विद्यार्थ्यांचा एक ब्लॉक असणार आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असणार्‍या नऊ विभागीय मंडळांच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2018 मधील बारावीच्या परीक्षेला दि. 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.
यंदा बारावीच्या परीक्षेसाठीच फक्त थेट सीलबंद पेपरचा अवलंब केला जाणार आहे. दहावीची परीक्षा प्रचलित पद्धतीने होईल. या निर्णयामुळे कॉपी प्रकारास पायबंद बसेल.
- पुष्पलता पवार, प्रभारी अध्यक्ष विभागीय शिक्षण मंडळ