Wed, Mar 27, 2019 00:39होमपेज › Kolhapur › टेम्पो अडवून दुधाचे गरजूंना वाटप

टेम्पो अडवून दुधाचे गरजूंना वाटप

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:26PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाला जिल्ह्यात तिसर्‍या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी आंदोलकांनी दूध घेऊन जाणारे टेम्पो अडवून ते दूध गरजूंना व विद्यार्थ्यांना वाटप केले.

हेरलेत गोकुळची गाडी आंदोलकांनी अडवली

हेरले (वार्ताहर) : हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाची गाडी अडवली.त्यानंतर गाडीमधील 9 कॅनमधील दूध मोफत वाटले. तसेच गावातील शेतकर्‍यांनीही गेले तीन दिवस दूध डेअरीस न घालता घरी ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला आहे. 

पट्टणकोडोलीत बौद्ध वस्तीत दुधाचे वाटप

पट्टणकोडोली (वार्ताहर) : पट्टणकोडोली येथे दूध बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व दूध उत्पादकांनी दूध डेअरीला न पाठवता किंवा दूध ओतून दुधाची नासाडी न करता गावातील गरजू नागरिकांना तसेच बौद्ध समाजातील नागरिकांना वाटप केले. यावेळी संदीप शिरगुप्पे, अमोल डुम, प्रकाश खटकोळे, रिजवान मुजावर, राजू किर्तीकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.  
भेंडवडेत पहाटे दूध संकलन

खोची (वार्ताहर) : भेंडवडे येथे तिसर्‍या दिवशी संपूर्ण संकलन बंद ठेवण्यात आले होते. बुवाचे वठार, खोची येथील काही दूध संस्थांनी पहाटे संकलन करून दूध संघांना पाठविले. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. निर्णय  होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ज्यादा दूध असणार्‍या गाय दूध उत्पादकांना या दुधाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्‍न निर्माण झाला होता.त्यामुळे काही दूध संस्थांनी पहाटे दूध संकलन केले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक बनले. चक्‍काजाम आंदोलनात जनावरे घेऊन सहभागी होण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. 

रुईत दूध संकलन ठप्पच

रुई (वार्ताहर) : रुई येथे दूध बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी रुई सहकारी दूध उत्पादक डेअरीच्या वतीने सभासदांनी सुमारे 100 लिटर दूध अण्णासाहेब राजमाने विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप केले. यावेळी सरपंच तनुजा सरोदे, उपसरपंच सुभाष चौगुले, माजी सरपंच बापूसाो आवटे, अध्यक्ष विष्णू सावंत, माजी अध्यक्ष अमोल आवटे, जवाहरचे संचालक अभयकुमार काश्मिरे आदी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांसह गरजूंना दुधाचे वाटप

कुंभोज (वार्ताहर) : कुंभोज, हिंगणगाव, दुर्गेवाडी, नेज-शिवपुरी, बाहुबली, नरंदे परिसरात दूध बंद आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशीही दूध उत्पादक व दूध संस्थांचा 100 टक्के प्रतिसाद मिळाला. या सर्व परिसरातील दूध उत्पादकांनी या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थी व गरजूंना दुधाचे मोफत वाटप केले. शुभम दूध डेअरीचे मालक व महात्मा गांधी तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष अजित गोपुडगे यांनी बुधवारी सकाळी 8 वाजता आदिनाथ चौकात 200 लिटर दुधाचे मोफत वाटप केले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रकाश पाटील, महेश पांडव, आदिनाथ पाटील, बाहुबली पाटील, दिनेश पाटील, बाळासो कासार, महेश चौगुले, मनोज जरदे, भरत भोकरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टेम्पोतील दुधाचे गरिबांना वाटप

शिये(वार्ताहर) :   शिये - भुये येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निगवे दुमाला येथे पाळत ठेवून बुधवारी सकाळी दूध वाहतूक करणारी वाहने आडवली व त्या गाड्यांची मोडतोड किंवा दुधाची नासधूस न करता त्यातील सर्व दूध शिये येथील विठ्ठलनगर व श्रीरामनगर येथील गोरगरिबांना वाटप केले. 

काही दूध संस्था संकलन करत आहेत. अशा संस्थांकडून संकलित झालेले दूध गोळा करून नेणार्‍या टेम्पोवर पाळत ठेवून केर्ले, प्रयाग चिखली, वडणगे येथील  काही संस्थांची दूध वाहतूक वाहने अडवली. आणि शिये - भुये येथील कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला व त ते दूध गरजू-गोरगरिबांना वाटप केले. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील,  बाजीराव पाटील  ( भुये ), योगेश पाटील, प्रदीप पाटील, पवन शिंदे, बंडा मगदूम, संजय पाटील, स्वप्निल पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिये येथे चार दूध संस्था आहेत. त्यांचे  सकाळ - संध्याकाळ दोन्ही वेळेचे दूध संकलन सुमारे साडेतीन हजार लिटर आहे. सर्वच दूध संस्थांनी दूध संकलन बंद ठेवून दूध दराविषयी सुरू असलेल्या राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

पोलिस बंदोबस्तात वाहने रवाना 

हुपरी (वार्ताहर) : बुधवारी रेंदाळ व इंगळी येथे दूध संकलन करण्यात आले. संकलन झालेले दूध गोकुळ दूध संघासाठी पोलिस बंदोबस्तात पाठवण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध संकलन बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 
बुधवारी सायंकाळी दूध उत्पादक शेतकर्‍यांनी रेदाळ व इंगळी येथील दूध संकलन केंद्रात दूध दिले. यावेळी इंगळी येथे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चौकात थांबले होते. त्यामुळे संकलन झालेल्या दुधाची वाहने पोलिस बंदोबस्तात एम.आय.डी.सी.पर्यंत पाठवण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नानीबाई चिखलीत 15 हजार लिटरचे दूध संकलन ठप्प 

नानीबाई चिखली (वार्ताहर) : नानीबाई चिखली येथे दूध संकलन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गावातील चारही  दूध संस्थांचे संकलन बुधवारीही बंद होते.  येथील शेतकरी दूध संस्था, श्री महालक्ष्मी दूध संस्था, कै. रावसाहेब भोसले दूध संस्था, वाय. टी. पाटील डेअरी या चार  दूध  संस्थांचे सुमारे 15 हजार लिटर दुधाचे संकलन पूर्णपणे ठप्प झाले. वाय. टी. पाटील दूध संस्थेच्या वतीने अरविंद पाटील व अमर पाटील यांच्या हस्ते  ग्रामस्थांना मोफत दुधाचे वाटप करण्यात आले. दुधाचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. 

11 हजार लिटर दूध संकलन ठप्प

दोनवडे (वार्ताहर) : दूध बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर दोनवडे, खुपिरे, साबळेवाडी, नागदेववाडी, पाडळी खुर्द, शिंदेवाडी, बालिंगे या सात गावांतील दूध संस्थांनी संकलन बंद करून बंद आंदोलनास पाठिंबा दर्शवला. यामुळे सात गावांतील एकूण 12 हजार लिटर दूध संकलन ठप्प झाले.