Thu, May 23, 2019 20:46
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आचारसंहितेवरून वातावरण तापले

आचारसंहितेवरून वातावरण तापले

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:46AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सर्वसाधारण सभेदिवशी सभागृहाला शिस्त लागावी, या हेतूने जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी प्रशासनाच्या मदतीने सदस्य व अधिकार्‍यांसाठी काढलेल्या आचारसंहितेवरून जिल्हा परिषदेत वातावरण तापू लागले आहे. विरोधी सदस्यांनी याचा तीव्र शब्दात निषेध करत या परिपत्रकाची जि.प. समोरच होळी करण्याचा इशारा दिला आहे. सत्ताधारी सदस्य उघड बोलू शकत नसले तरी ही मुस्कटदाबी असल्याच्या भावना व्यक्‍त करत आहेत. 

जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेत सदस्य गोंधळ घालतात. पहिल्या सभेपासून अध्यक्ष महाडिक यांनी सभागृहाची शिस्त पाळा, असे वारंवार सांगितले आहे. तरीदेखील गेल्या वर्षभरातील चारही सभांमध्ये गोंधळ ठरलेलाच आहे. सदस्या-सदस्यांमध्ये वादावादी, अधिकार्‍यांना गैरहजेरीवरून धारेवर धरण्याचे प्रकारही घडले आहेत. या सर्व गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अध्यक्ष महाडिक यांनी गेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य व अधिकार्‍यांसाठी आचारसंहिता करत असल्याचे सभागृहात जाहीर केले होते. 

त्यानुसार त्यांनी सदस्य व अधिकारी यांना उद्देशून जि.प. सभा कामकाज नियम 1964 नुसार 26 सूचनांचा समावेश असलेली आचारसंहिता तयार केली आहे. याची प्रत शुक्रवारी सदस्यांना हातात पडल्यानंतर यातील नियम वाचून रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच प्रतिक्रिया सर्व सदस्यांतून उमटली आहे. जि.प. चे 67 सदस्य हे 25 ते 30 लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना निवडून आल्यानंतर यशदामार्फत कामकाजाचे प्रशिक्षणही दिले जाते. मग पुन्हा वेगळी नियमावली का, असा सवाल ते करत आहेत. सभागृहात गोंधळ घालणार्‍या सदस्यांना सभागृहातूनच निलंबित करण्यात येईल, या सूचनेवरच सर्व सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. जनतेने प्रश्‍न विचारण्यासाठीच निवडून दिलेले असते. अशाप्रकारे निर्बंध घालणे हा जनतेचा अवमान असल्याच्या विरोधी सदस्यांच्या भावना आहेत. सत्ताधारी सदस्यांमधूनही या आचारसंहितेवरून नाराजीचा सूर आहे. 

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार : पाटील

आम्ही जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्‍न आम्हाला महत्त्वाचे वाटतात. हे सभागृहात मांडणे आमचे कर्तव्य आहे, पण त्यासाठी अशाप्रकारची आचारसंहिता लावणे ही लोकप्रतिनिधींची मुस्कटदाबीच असून लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रकार आहे. सदस्य म्हणून तो आम्ही कदापिही खपवून घेणार नाही, असा इशारा सतीश पाटील यांनी दिला.

सभागृहात तोंडावर पट्टी बांधून यायचे का : भांदिगरे

सभागृह हे बोलण्यासाठीच असते आणि या बोलण्यावरच जर निर्बंध घालणार असाल तर सभागृहात काय तोंडावर पट्टी बांधून यायचे का? महापालिकेत भाजप व ताराराणीचे सदस्य बाकावर उभे राहून शंखध्वनी करतात ते तुम्हाला चालते, आम्ही नुसत्या जनतेच्या व्यथा आक्रमकपणे मांडतो तर तुम्ही आम्हाला लगेच आचारसंहिता शिकवता. भाजपकडून हा दुजाभाव का, याचेही उत्तर मिळायला हवे, असे जि.प. सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी सांगितले.