Wed, Jan 16, 2019 13:29होमपेज › Kolhapur › पोलिस आणि आदोलकांत झटापट : १२० जण ताब्यात

पोलिस आणि आदोलकांत झटापट : १२० जण ताब्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूवी शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाशीनाका परिसरात अटकाव केला. यावेळी पोलिस व आंदोलकांत जोरात झटापट, वादावादी झाली. जोरदार घोषणाबाजी करून आंदोलकांनी सारा परिसर दणाणून सोडला. माजी आमदार संपतराव पवार-पाटील, शिवाजीराव परूळेकर, उदय नारकर, सुभाष पाटीलसह 120 जणांना अटक करून सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली. 

शेतकर्‍यांना कर्जमुक्‍त करा, स्वामीनाथन समितीच्या शिफारशीनुसार सर्व शेतीमालाला उत्पादन खर्चावर पन्नास टक्के वाढावा मिळावा त्यासाठी कायदा करावा, विजेचा पुरवठा आठ तासांऐवजी अखंडित करावा, शेगाव (जि. अहमदनगर) येथील शेतकर्‍यांवर गोळीबार करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी होऊन त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. किमान एफआरपी आणि त्यावरील मान्य केलेला वाढीव ऊस दर राज्यभर द्यावा, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौर्‍यात काळे झेंडे दाखविण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नवीन वाशी नाका परिसरात मोठी गर्दी केली. सायंकाळी चारच्या सुमाराला जोरात घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याच्या आंदोलकांच्या निर्धारामुळे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव, संजय साळुंखे यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात होता. पोलिस अधिकार्‍यांनी चर्चा करून आंदोलन माघारी घेण्याची आवाहन केले. मात्र, काळे झेंडे दाखविण्याचा आंदोलकांनी निर्धार केल्याने पोलिसांनी त्याना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.