Fri, Apr 26, 2019 04:02होमपेज › Kolhapur › मेहुण्या-पाहुण्यांतला वाद चार भिंतीत मिटवा

मेहुण्या-पाहुण्यांतला वाद चार भिंतीत मिटवा

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 23 2018 1:50AMकोल्हापूर : प्रतिनिधी

के. पी. तुम्ही आणि ए. वाय. मेहुणे-पाहुणे आहात, तुमची धाकटी बहीण ए. वाय. यांना दिली आहे. गेल्या चार पिढ्यांचे तुमचे घट्ट नाते आहे. हे नाते टिकविण्याबरोबरच पक्षाशी नाते टिकवा, ए. वाय. हेही पक्षाचेच काम करतील, कोणाला काय आणि कधी द्यायचे, हे त्या-त्या वेळचे निर्णय असतील, असा प्रेमाचा कानमंत्र आ. हसन मुश्रीफ यांनी माजी आमदार के. पी. पाटील यांना दिला.ए. वाय. आणि के. पी यांच्यातील संघर्षावर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष निवड बैठकीत झालेल्या टीका-टिपणीवर आ. मुश्रीफ बोलत होते. एवढेच नाही तर हा वाद दोघांनीही पुन्हा कुठेही काढू नका, आम्हा कार्यकर्त्यांची शपथ आहे, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले.

दाजींचा (ए. वाय.) वाढदिवस झाला, मी त्यांना शुभेच्छा देऊ शकलो नाही. त्यांच्या धाकट्या बंधूंना फोन करून दाजी कुठे आहेत, ते विचारले. मात्र, ते माहीत नाही म्हणाले, म्हणून अर्जुनवाड येथे गेलो. मात्र, मी जाण्यापूर्वीच दाजींनी स्टार्टर मारला होता. साहजिकच आमची भेटच झाली नाही. त्यामुळे आज शुभेच्छा देत आहे, असे सांगून के. पी. पाटील  म्हणाले, त्यांची प्रकृती चांगली राहो, त्यांनी राष्ट्रवादीचेच काम करावे. जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांना बळ द्यावेे.

आ. मुश्रीफ म्हणाले, भाजप सरकारवर समाजातील कोणताही घटक खूश नाही. सर्व घटकांची नाराजी आहे. उन्‍नाव, कठुआ बलात्कार प्रकरणांवर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. आता सगळे झाल्यावर बँकबुडव्यांवर कारवाईसाठी कायदा केला. त्यांना उशिरा जाग आली. शेतकरी कर्जमाफीचे जिल्ह्यात 650 कोटी रुपये यायला हवे होते. प्रत्यक्षात केवळ 300 कोटी रुपये आले आहेत. कर्जमाफी अर्जाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. सरकारमध्येच संभ्रमावस्था असल्याने अनेक शेतकरी परतफेड करीत नाहीत. साहजिकच कर्ज वाढत आहे. बँका अडचणीत येत आहेत. साखर उद्योग संकटात सापडला आहे. साखरेचा दर अडीच हजारांवर आला आहे. साखर निर्यातीबाबत सरकारने पूर्वीच धोरण जाहीर केले असते, तर ही वेळच आली नसती.  कच्ची साखर निर्यात करता आली असती, तर दर पडले नसते. त्यामुळे आता साखर उद्योगास संकटातून बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनीच लक्ष घातले पाहिजे.

एवढे कोटी दिले, एवढा कोटी खर्च झाला, असे भाजप नेते सांगत असतात. पैशाचे हे आकडे पाहून आमच्या अंगाला घाम सुटतोय. त्यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला, हाच खरा प्रश्‍न आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आताच खरी परीक्षा आहे. त्यांनी हाडाची काडं आणि रक्‍ताचं पाणी करून निवडणुकीस समोर जावे. जगज्जेता सिकंदर मृत्यूनंतर रीत्या हाताने गेला, हे जगजाहीर आहे. त्यामुळे पैशाने सर्वकाही होत नाही. जनता पेटून उठल्यानंतर पैशाचे काही चालत नाही, हे ध्यानात ठेवा.  प्रत्येकवेळी पैशाचे दर्शन घडवू नका, असा सल्‍ला आ. मुश्रीफ यांनी भाजपला दिला. आगामी काळात शेतकर्‍यांना न्याय न मिळाल्यास उसाच्या बुडक्याने सत्ताधार्‍यांना दणका देऊ, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.

पक्षसंघटना बळकटीबाबत ते म्हणाले, आघाडी झाल्याने काही मतदार संघात आपली ताकद कमी आहे. त्या ठिकाणी बळ वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा. काँग्रेसशी आाघडी झाल्यास पाच विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करावे लागेल. काँग्रेसने शरद पवारांना मोठेपणा देऊन विरोधी पक्षांची मोट बांधण्याची संधी दिली आहे. हे आपल्यादृष्टीने चांगले आहे. पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची ताकद वाढवू या, असे आवाहन आ. मुश्रीफ यांनी केले.

के. पी. पाटील म्हणाले, हल्‍लाबोल आंदोलनातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कर्नाटकात काँग्रेसला सकारात्मक वातावरण आहे. जिल्ह्यात पक्षाचे काम उत्तम आहे. विशेषत: कागलमधील लोक निवडणूक कधी येईल, अशी वाट पहात आहेत. तशीच स्थिती संपूर्ण जिल्ह्यात निर्माण करावी.ए. वाय. पाटील म्हणाले, प्रदेशपातळीवर कोल्हापूरचे कौतुक केवळ नेते आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांमुळे होते. हे सर्व श्रेय कार्यकर्त्यांचे आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि आमदार देऊन पवार साहेबांचे हात बळकट करू या.खा. धनंजय महाडिक म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जनतेतून उठाव होत आहे. राष्ट्रवादीच्या हल्‍लाबोल आंदोलनास सर्वत्र प्रतिसाद मिळाला. आता कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी जोमाने  प्रयत्न करावेत.

Tags : Kolhapur, Dispute, between, Family