Tue, Jun 02, 2020 20:12होमपेज › Kolhapur › ...तर मनपा बरखास्त करा

...तर मनपा बरखास्त करा

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:25PMकोल्हापूर :प्रतिनिधी 

राज्य शासनाने महापालिकेतील स्थायी समितीचे 25 लाखांवरील अधिकार कमी केल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. लोकप्रतिनिधींचे अधिकार कमी केले जात असल्याने शासनाच्या निषेधाचा ठराव करावा, अशी सूचना नगरसेवकांनी केली. तसेच आमदारांनी यामध्ये लक्ष घालावे. नगरसेवकांचे अधिकार कमी करणार असाल तर महापालिकाच बरखास्त करा, अशी मागणी करून लोकशाहीच्या नावाखाली नोकरशाहीची हुकूमशाही सुरू असल्याचा आरोपही सभेत करण्यात आला. 

प्रशासनाच्या वतीने शासनाने अ, ब, क व ड वर्ग अशी वर्गवारी करून अधिकार देण्याचे नियोजन केले आहे. अंतिम निर्णय व्हावयाचा आहे, असे स्पष्ट केले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती आशिष ढवळे होते. अफजल पिरजादे, डॉ. संदीप नेजदार, दीपा मगदूम, सौ. गीता गुरव आदींनी चर्चेत भाग घेतला. कोंबडी बाजार येथील प्रोजेक्टचे काय झाले? मल्टीलेव्हल कार पार्किंगचे काय झाले, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाच्या वतीने मल्टीलेव्हल कार पार्किंगबाबत फेरविनिदा काढणार आहे. 20 जुलै रोजी कोंबडी बाजार प्रोजेक्टबाबत आयुक्‍तांनी अंतिम बैठक बोलवली 
आहे. त्यामध्ये निर्णय होणार आहे, असे स्पष्ट केले. 

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तांचे 2 दिवसांत नियोजन करणार होता त्याचे काय झाले, असा प्रश्‍न सदस्यांनी विचारला. प्रशासनाच्या वतीने डॉग स्कॉडसाठी कर्मचारी पाठविले होते. नवीन डॉक्टरांचे पॅनेल तयार केले आहे. प्रत्येक डॉगमागे ऑपरेशनसाठी 250 रुपये देण्याचे ठरले आहे, असे स्पष्ट करण्यात आले. जरगनगर येथील महापालिकेच्या शाळेच्या आवारात चिखल झाला आहे. मुलांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तेथे मुरूम टाकून द्या, अशी सूचना सदस्यांनी केली. 

प्रशासनाच्या वतीने मंगळवारी मुरूम उपलब्ध करून देऊ, असे सांगण्यात आले. देवकर पाणंद पेट्रोल पंप ते देवकर पाणंद चौक येथे रस्त्याकडेला मातीचे ढीग टाकलेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चिखल होतो. विभागीय कार्यालयाकडील जेसीबीच्या साह्याने रस्त्यावरील माती काढून टाका. तसेच भागामध्ये मटेरियल न मिळाल्याने बहुतांश खांबावरील वीज बल्ब बंद आहेत, असे सदस्यांनी सांगितले. प्रशासनाच्या वतीने कारवाई करू, असे स्पष्ट करण्यात आले.