Fri, Apr 26, 2019 17:50होमपेज › Kolhapur › वाहतूक पोलिस ट्रिपल सीट जात असल्याच्या फोटोची चर्चा

‘तो’ फोटो अल्पवयीन वाहनचालकावर कारवाईचा

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘असे केवळ कोल्हापुरातच घडते,’ अशा टॅगलाईनने मोपेडवरून ट्रिपल सीट जाणार्‍या वाहतूक शाखेच्या पोलिसाचा फोटो बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पाठीमागे दोन मुलांना घेऊन तो सिग्‍नलला थांबल्याचे दिसत आहे. अल्पवयीन वाहनचालकावर कारवाई करून त्याला सोबत घेऊन जातानाचा हा फोटो असल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. 

स्टेशन रोडवर मोपेडवरून निघालेल्या अल्पवयीन चालकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे वाहन परवाना नसल्याने त्याच्यावर कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेकडे जाण्यास सांगण्यात आले. याला त्याने नकार दिला. यामुळे वाहतूक शाखेचे पोलिस रणजित साळवी हे त्याला पाठीमागे बसवून मोपेडसह दसरा चौकाकडे येत होते. यावेळी संबंधित अल्पवयीन युवक पळून जाण्याच्या तयारीत दिसल्याने त्याला पकडून आणखी एका तरुणाला बसविण्यात आले होते असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

व्हीनस कॉर्नर येथे तिघे आले असता बाजूने जाणार्‍या कोणीतरी याचा फोटो काढून तो सोशल मिडीयावर शेअर केला. बुधवारी दिवसभर या फोटोची शहरात चर्चा सुरु होती.