Fri, Jul 19, 2019 18:24होमपेज › Kolhapur › चर्चेनेच आरक्षणाची कोंडी फुटेल

चर्चेनेच आरक्षणाची कोंडी फुटेल

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी चर्चा अत्यावश्यक आहे. याबाबतची सुरुवात आरक्षणाचे जनक  असणार्‍या लोकराजा राजर्षी छत्रपतींच्या शाहूनगरीतून झाली तर महत्त्वाचे ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेली महिन्याभरापासून सुरू असणार्‍या दसरा चौकातील ठिय्या आंदोलनासह  छत्रपती शिवाजी चौकातील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सोमवारी ते कोल्हापुरात आले होते. आंदोलन स्थळी भेटीनंतर त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी चर्चाही केली. छत्रपती शिवाजी चौकातील शौर्यपीठावर मार्गदर्शन करताना अ‍ॅड. खेडेकर म्हणाले,  हिंसक आंदोलनाने प्रश्‍न सुटणार नाही. तरुणांची माथी भडकविणारे आंदोलन कोणीही करू नये. कायद्याने भांडण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासक, संशोधक, वकिलांचे मार्गदर्शन गरजेचे आहे. ज्येष्ठांचा अनुभव आणि नवोदितांचा सक्रिय सहभाग यातून विचाराने आणि कायद्याने भांडणारी समिती तयार करणे आवश्यक आहे. यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घ्यावा, राज्यव्यापी जनजागृती राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. 
अभिनेते विजय पाटकर यांचा ठिय्या

दसरा चौकात सुरू असणार्‍या सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक ठिय्या आंदोलनास अभिनेते विजय पाटकर यांनी पाठिंबा दिला. याशिवाय दिवसभरात मौजे कळंबे तर्फ ठाणे येथील श्री हनुमान सहकार दूध संस्थेचे धनाजी बराले, धोंडिराम मिरजे, भादोले (ता. हातकणंगले) येथील श्री हनुमान सहकारी दूध संस्थेचे सूर्याजी माने, धोंडिराम पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्हा टू व्हील मेकॅनिक असो.चे इसाक मुजावर व संतोष हराळे आणि जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे जीनदत्त चौगले, आनंदराव सोहनी व सहकार्‍यांनी पाठिंबा दिला. 

शिवाजी चौकात पाठिंब्याचा ओघ

छत्रपती शिवाजी चौकातील ठिय्या आंदोलनास आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, बाबा पार्टे, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील, राजू वणकुंद्रे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत मेहता, सत्यमेव जयतेचे समीर पठाण व सहकारी, पार्थ फिटनेस ग्रुपचे विवेक रणनवरे, मरगाई गल्ली  शिवाजी पेठेतील महिला मंडळाच्या सदस्या उषा जाधव, शीला शिंदे, चंद्रभागा जाधव, सुशीला राऊत, अश्‍विनी पाटील, स्वाती शिंदे, जुबेदा शेख, खंडोबा-वेताळ तालीम आणि सुहासराजे ठोंबरे मर्दानी खेळ आखाड्याचे मावळे व शिवशाहीर मिलिंद सावंत, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे देवदत्त माने व विकास चौगुले यांच्यासह मान्यवरांनी पाठिंबा दिला.