Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Kolhapur › आवाडे-आवळे यांच्यात गुफ्तगू?

आवाडे-आवळे यांच्यात गुफ्तगू?

Published On: Jul 09 2018 1:19AM | Last Updated: Jul 09 2018 12:19AMइचलकरंजी : प्रतिनिधी 

कोल्हापूर जिल्हा काँग्रेसमध्ये जयवंतराव आवळे व पी. एन. पाटील गट आणि आवाडे गट असा उघड संघर्ष असताना आवाडे पिता-पुत्रांनी जयवंतराव आवळे यांची महात्मा फुले सूतगिरणीवर भेट घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेसपासून चार हात दूर राहणार्‍या आवाडे यांनी पुन्हा काँग्रेसशी जमवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून त्यांनी आवळे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. प्रकाश आवाडे जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून, या निवडीसाठी आवळे यांच्या मतांची चाचपणी या भेटीत आवाडे पिता-पुत्रांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. 

गत विधानसभा निवडणुकीपूर्वी आवाडे व आवळे यांनी मतभेद विसरत एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत आवाडे यांच्यामुळेच वडगाव विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा पुनरुच्चार जयवंतराव आवळे यांनी वारंवार केला होता. त्यामुळे आवाडे व आवळे यांच्यात विस्तवही जात नाही, अशी स्थिती होती. 

गत विधानसभा निवडणुकीत आवाडे यांनी राजूबाबा आवळे यांना वडगावात मदत करावी व आवळे यांनी आवाडे यांना इचलकरंजीत मदत करावी, असे ठरवण्यात आले होते. प्रत्यक्षात राजूबाबा व प्रकाश आवाडे असे दोघेही पराभूत झाले. त्यानंतर आवाडे यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आग्रह धरण्यास सुरुवात केली. परंतु, आवळे व पी. एन. पाटील गटाने त्यांची डाळ शिजू दिली नाही. प्रकाश आवाडे यांनी कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले. परंतु, संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला. तेव्हापासून आवाडे व आवळे-पी. एन. पाटील यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले आहे. काँग्रेस नेतृत्वाला किंवा जिल्ह्यातील नेत्यांना जोपर्यंत सुबुद्धी सुचत नाही, तोपर्यंत काँग्रेसचे काम करणार नाही, असा पवित्रा प्रकाश आवाडे यांनी घेतला आहे. 

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांनी आवाडे यांना जिल्हाध्यक्षपदावर संधी देण्याचा शब्द दिला आहे. परंतु, निवडणुकीनंतर सतेज पाटील यांनी हा शब्द पाळला नाही. असे असले तरी लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने आवाडे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. अलीकडेच त्यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. 

या पार्श्‍वभूमीवर प्रकाश आवाडे व कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी जयवंतराव आवळे यांची भेट घेऊन नेमके काय गुफ्तगू केले याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या भेटीवेळी राहुल आवाडे, संजय आवळे, राजूबाबा आवळे आदी उपस्थित होते. 

खर्गे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तर ही भेट झाली नाही ना, असा एक प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील नेत्यांना आवाडे यांच्याशी जमवून घेण्याचे आदेश खर्गे यांनी वरिष्ठ पातळीवरून दिल्याचेही सांगण्यात येत आहे. आवाडे गट एक मोठी ताकद असल्याने काँग्रेसला जिल्ह्यात ती उपयुक्त ठरणार असल्याने त्याचे महत्त्व खर्गे यांनी जाणल्याचेही सांगण्यात येत आहे.