Sat, Apr 20, 2019 07:57होमपेज › Kolhapur › महादेवराव महाडिक-समरजित यांच्यात गुफ्तगू

महादेवराव महाडिक-समरजित यांच्यात गुफ्तगू

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माजी आमदार महादेवराव महाडिक व ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची आज, सोमवारी ‘गोकुळ’मध्ये अर्धा तास गुफ्तगू झाले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कागल तालुक्यात होत असलेल्या नवनवीन राजकीय समीकरणांचा संदर्भही या बैठकीमागे असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील तालुका म्हणून कागल तालुका ओळखला जातो. या तालुक्यात अलीकडे नवनवीन राजकीय समीकरणे तयार होत आहेत. खा. धनंजय महाडिक यांचे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी बिनसले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आ. मुश्रीफ यांनी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना लोकसभेसाठी पुढे आणण्यास सुरुवात केली आहे. या दोघांतील गट्टी चर्चेचा विषय ठरली आहे. आ. मुश्रीफ-प्रा. मंडलिक लोकसभेसाठी एकत्र आले तर महाडिक गटासाठी कागल तालुक्यात चांगलीच धावपळ करावी लागणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवरच बेरजेचे राजकारण करण्यासाठी माजी आमदार महाडिक व समरजितसिंह घाटगे यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचे समरजितसिंह घाटगे यांना कागल मतदारसंघातून विधानसभेवर जायचे आहे. तर भाजपातच असलेले संजय घाटगे यांनाही विधानसभा निवडणूक लढवायची आहे. या दोन्ही घाटगे गटांची ताकद लोकसभेसाठी एकत्र करण्याचे नियोजन महादेवराव महाडिक करत आहेत. यासाठी समरजितसिंह घाटगे यांना विधान परिषद, तर संजय घाटगे यांना भाजपकडून विधानसभेची उमेदवारी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशीही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. समरजितसिंह घाटगे यांची कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातही ताकद आहे. त्यामुळे घाटगे यांना विधान परिषदेसाठी मदत करून त्यांची लोकसभा व कोल्हापूर दक्षिणसाठी मदत घेण्याचे नियोजन या भेटीमागे असल्याची चर्चा आहे.