Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Kolhapur › खासगी सावकारीचा जिल्ह्याला विळखा!

खासगी सावकारीचा जिल्ह्याला विळखा!

Published On: Feb 05 2018 1:30AM | Last Updated: Feb 04 2018 11:38PMकोल्हापूर : सुनील कदम

कोल्हापूर शहर आणि उपनगरी भागात खासगी सावकारांनी थैमान मांडल्याचे दिसत आहे. अनेक गोरगरीब कुटुंबे, मजूरवर्ग, शहरातील छोटे-मोठे व्यापारी, किरकोळ विक्रेते, कमी पगार असणारे अनेक नोकरदार, महापालिकेचे अनेक कर्मचारी गेल्या कित्येक दिवसांपासून या खासगी सावकारांच्या दावणीला बांधले गेल्याचे दिसत आहे. पोलिस खात्याने व्यापक मोहीम हाती घेऊन सर्वसामान्यांच्या मानगुटीवर बसलेल्या या सावकारांचा बीमोड करण्याची आवश्यकता आहे.

काही अपवाद वगळता शहरातील सहकारी आणि सरकारी बँका, पतसंस्था लहानसहान, किरकोळ आणि फारशी आर्थिक पत नसलेल्या कर्जदारांना त्यांच्या छोट्या-मोठ्या आणि तातडीच्या अडीअडचणींसाठी मदत करायला नाखूश असलेल्या दिसतात. सहसा अशा कर्जदारांना या बँका-पतसंस्था दारातसुद्धा उभा करायला राजी नसतात. त्यामुळे अशा गरजवंतांना नाइलाजास्तव खासगी सावकारांच्या दारात जावे लागते. नेमका त्याचा गैरफायदा घेऊन खासगी सावकारी करणार्‍या मुजोरांच्या टोळ्याच तयार झालेल्या आहेत. मासिक पाच टक्क्यांपासून ते पंचवीस टक्क्यांपर्यंत व्याजाने या सावकारांकडून गरजूंना पैसे देण्यात येतात. मात्र, त्यानंतरही व्याजावर व्याज, कर्जाचा हप्ता चुकल्यास दंडव्याज अशा पद्धतीने कर्जाची वसुली केली जाते. त्यामुळे अनेकवेळा कर्जाच्या दसपट रकमेचा परतावा करूनसुद्धा कर्जदार या दुष्टचक्रात अडकतच जातो. एकदा का या सावकारांच्या कचाट्यात सापडले की, सहसा त्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते. आजघडीला शहर आणि उपनगर भागातील हजारो कुटुंबे या सावकारांच्या दावणीला बांधली गेल्याचे आढळून येत आहे.

ही खासगी सावकारी म्हणजे एकप्रकारची संघटित गुन्हेगारी असल्याचे दिसत आहे. कारण, बहुतेक सगळे सावकार स्वत: गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित असून, त्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी आपल्या पदरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांच्या झुंडीच्या झुंडी बाळगल्या आहेत. त्यांच्याकडून कर्जदारांना धाकदपटशा दाखवून मनमानी पद्धतीने वसुली केली जाते. बहुतेक सगळ्या सावकारांच्या दिमतीला अशाप्रकारे गुंडांचे तांडे असल्यामुळे अन्याय होऊनही कर्जदार कुणाकडे दाद-फिर्याद मांडण्याचे धाडस करीत नाहीत. त्यामुळे या सावकारी टोळ्यांचे दिवसेंदिवस फावत चालले आहे. सावकारीचा धंदा करणार्‍या शहरात अशा शंभरावर टोळ्या असल्याचे दिसून येत आहेत. पोलिसांनीच आता पुढाकार घेऊन या संघटित आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या खासगी सावकारीविरुद्ध एखादे निर्णायक ‘ऑपरेशन’ हाती घेण्याची आवश्यकता आहे.