Tue, Jul 23, 2019 01:54होमपेज › Kolhapur › भेसळखोरांमुळे आरोग्य धोक्यात

भेसळखोरांमुळे आरोग्य धोक्यात

Published On: Apr 23 2018 1:50AM | Last Updated: Apr 22 2018 11:33PMकोल्हापूर : सुनील कदम

कोल्हापूर शहर आणि परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यान्‍नातील भेसळीने अक्षरश: कळस गाठला आहे. या भेसळीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून याबाबत सातत्याने चर्चा आणि तक्रारी सुरू असतानासुद्धा अन्‍न व औषध प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता याप्रकरणी उच्चस्तरीय कारवाई करण्याची आवश्यकता आहे.

शहरात परंपरागतपणे मिठाईचा व्यवसाय करणारी आणि खर्‍याखुर्‍या मिठाईसाठी आपला नावलौकिक टिकवून असलेली काही दुकाने आहेत. मात्र, त्यापेक्षा जादा भेसळीचा मिठाई बाजार मांडून बसलेली दुकाने आहेत. या भेसळबाज मिठाईच्या किमती खर्‍याखुर्‍या मिठाईपेक्षा खूपच कमी असल्यामुळे प्रामुख्याने गोरगरीब आणि काही प्रमाणात मध्यमवर्गीय समाज या भेसळीच्या मिठाईला बळी पडताना दिसतो आहे.

शहर आणि परिसरात जवळपास दोनशेहून अधिक चायनीज पदार्थांचे गाडे आणि हॉटेल्स आहेत. यापैकी किती व्यावसायिकांकडे अन्‍न व औषध प्रशासनाचा परवाना आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या ठिकाणी चायनीज पदार्थांच्या नावावर काय-काय विकले जाते, याचा सर्वसामान्यांना थांगपत्तासुद्धा लागत नाही. चायनीज पदार्थांमध्ये प्रामुख्याने सोयाबीन कृत्रिमरीत्या कुजवून केलेले सोयासॉस, कॉर्नफ्लॉवर, अजिनोमोटो, अनेक प्रकारचे रंगीत सॉस, काही रासायनिक पावडरी, मोनो सोडियम ग्लुकामेट इत्यादी पदार्थ वापरण्यात येतात. ते आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर अन्‍न व औषध प्रशासनाच्या वतीने कधी तपासणी होताना दिसत नाही.

बहुतेक ठिकाणी शीतपेयांमध्ये खाण्याऐवजी औद्योगिक वापराच्या बर्फाचा वापर होताना दिसतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फळांच्या रसाच्या नावाखाली भलतीच रसायने ग्राहकांच्या घशात ओतण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा नुसता खेळखंडोबा सुरू आहे. मात्र, खुलेआम चालणार्‍या या प्रकाराची अन्‍न व औषध प्रशासनाने कधी दखल घेतल्याचे किंवा त्यांची चौकशी केल्याचे अभावानेसुद्धा आढळून येत नाही. त्यामुळे भेसळासुरांना मोकळे रान मिळत आहे.

Tags : Kolhapur, Disadvantages, health, threat