Thu, Aug 22, 2019 12:30होमपेज › Kolhapur › आयटीआयमधील निदेशकांची पदे रिक्‍त

आयटीआयमधील निदेशकांची पदे रिक्‍त

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 12:25AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) निदेशकांची पदे 2011 पासून भरली नसल्याने बहुतांश जागा रिक्‍त आहेत. शासनाच्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या द‍ृष्टीने शासन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान राबवित आहे. आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याकरिता व्यवसाय निदेशक हे पद प्रत्येक तुकडीसाठी एक आहे. गणित, चित्रकला शिकविण्यासाठी आठ तुकड्यांमागे एक गणित व चित्रकला निदेशक पद आहे. कोल्हापूर शासकीय आयटीआयचे काम 1974 पासून तीन शिफ्टमध्ये सुरू आहे. विविध 32 हून अधिक ट्रेडसाठी सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

शासनाने काही वर्षांपूर्वी आयटीआयमध्ये दुसरी व तिसरी शिफ्ट सुरू केली. त्यावेळी सुरू झालेल्या व्यवसाय तुकड्यांसाठी कं त्राटी निदेशक पदे मंजूर करण्यात आले. या कंत्राटी निदेशकांना दोन वर्षांवर कामावर ठेवून त्यानंतर कार्यमुक्‍त करण्यात आले. याच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. काही वर्षांपूर्वी राज्यस्तरावर निदेशक भरतीची प्रकिया राबविण्यात आली; परंतु त्यात त्रुटी असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रकिया रद्द करण्यात आली. अद्याप पद भरती झाली नसल्याने इतरांवर त्याचा अधिकचा भार पडत आहे.

कोल्हापुरात अद्याप 62 पदे रिक्‍त

कोल्हापूर आयटीआयमध्ये सर्व मिळून 186 पदे मंजूर आहेत. त्यामधील 124 पदे भरण्यात आली असून 62 अद्याप रिक्‍त आहेत. व्यवसाय निदेशकांच्या मंजूर 105 पदांपैकी 63 भरण्यात आली असून 42 रिक्‍त आहेत. बेसिक ट्रेनिंग सेंटरची 22 पदे मंजूर असून 12 पदे रिक्‍त आहेत. अशीच परिस्थिती बहुतांश आयटीआयमधील आहे.