Sun, Oct 20, 2019 11:24



होमपेज › Kolhapur › पोलिस महासंचालकांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर

पोलिस महासंचालकांचा कोल्हापूर दौरा लांबणीवर

Published On: Jul 17 2019 12:08PM | Last Updated: Jul 18 2019 1:57AM




कोल्हापूर : प्रतिनिधी

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा आज बुधवारपासूनचा दोन दिवसाचा कोल्हापूर दौरा लांबणीवर पडला आहे. तर कोल्हापूर पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी पोलिस महासंचालक दोन दिवसासाठी कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. 

पोलिस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जयस्वाल प्रथमच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने पोलिस दलाने जय्यत तयारी केली होती. पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती. पोलिस ठाण्यांतर्गत कामकाजाचे पोलिस महासंचालक स्वतः मुल्यांकन करणार असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील रेकॉर्ड अद्यावत करण्याबरोबरच प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू झाले होते. तसेच पोलिस महासंचालक शहर व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना भेटी देऊन येथील कामकाजाची पाहणी करणार होते. मात्र आज बुधवारी सकाळी पोलिस महासंचालक कार्यालयातून हा दौरा काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सायंकाळी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला महासंचालक जयस्वाल स्वतः उपस्थित राहणार आहेत. याशिवाय ते उद्या गुरुवारी दिल्ली येथील बैठकीसाठी ही रवाना होणार आहेत, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

याविषयी पोलिस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांना विचारला असता सांगितले की,  पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांचा दौरा काही काळासाठी लांबणीवर टाकण्यात आला आहे. पुढील महिन्यात कोल्हापूर पोलिस दलाच्या कामकाजाचे पोलिस महासंचालक स्वतः मुल्यांकन करणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.