होमपेज › Kolhapur › काळेधंदेवाल्यांना पाठीशी घालणार्‍यांचे थेट निलंबन

काळेधंदेवाल्यांना पाठीशी घालणार्‍यांचे थेट निलंबन

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सामान्यांच्या हितापेक्षा काळेधंदेवाले, तस्करी टोळ्या आणि गुंड-मवाल्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष साथ देऊन पोलिस दलाला कलंकित करणार्‍या पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकारी, कर्मचार्‍यांवर यापुढे बदली नव्हे, थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी रविवारी दिला. गणेशोत्सवासह अन्य धार्मिक सण, उत्सव काळात ‘डॉल्बी’ला थारा मिळणार नाही, असे निक्षून सांगत, लोकांशी चांगले संबंध ठेऊन पोलिस दलाची विश्‍वासार्हता वाढवा, असेही ते म्हणाले.

बकरी ईद, गणेशोत्सव, दहीहंडीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांची पोलिस मुख्यालयात बैठक झाली. सहा तास झालेल्या बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी शहरातील चारही पोलिस ठाण्यांसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांना केवळ दिखाऊपणा जुजबी नको, प्रत्यक्षात कारवाईत क्वॉलिटी अपेक्षित आहे. वरिष्ठांना खुश करण्यापेक्षा सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत प्रामाणिकपणे काम करून पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभर स्वीकारल्यानंतर डॉ. देशमुख यांनी रविवारी प्रथमच अप्पर पोलिस अधीक्षकांसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्‍यांची बैठक बोलाविली होती. अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत डॉ. देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणेनिहाय शांतता-सुव्यवस्था व गुन्हेगारी कारवाईचा आढावा घेतला.

सर्वसामान्यांना त्रास नको

सर्वसामान्यांना न्याय मिळावा तसेच जिल्ह्यात पोलिस दलाचा लौकिक वाढावा, याच उद्देशाने आपण पोलिस अधीक्षक पदाची धुरा स्वीकारली आहे. समाजकंटकांपासून सामान्यांना त्रास होणार नाही, याची पोलिस दलातील सर्वच घटकांनी दक्षता घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट करून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत आपणाला हातकणंगले येथील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करावी लागली. वास्तविक पोलिस उपअधीक्षक, प्रभारी पोलिस अधिकार्‍यांची जबाबदारी असताना वरिष्ठांना रस्त्यावर उतरावे लागते, हा प्रकार योग्य नाही.

अधिकाराचा गैरवापर नको;अन्यथा कठोर कारवाई

भविष्यात अशा घटनांना थारा दिला जाणार नाही. जे चांगले काम करतील त्यांच्या पाठीशी निश्‍चित ठाम राहू; पण अधिकाराचा गैरवापर करून काळेधंदेवाल्यासह समाजकंटकांची पाठराखण करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिकारी, कर्मचार्‍यांवर तातडीने निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘डॉल्बी’विरुद्ध कठोर कारवाई

सर्वोच्च न्यायालयाने ‘डॉल्बी’ला मनाई केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आदेशाचे पालन होईल, यात शंका नाही. यंदाच्या गणेशोत्सवात शहरासह जिल्ह्यात कोठेही डॉल्बीचा दणदणाट जाणवणार नाही. आदेशाचे उल्लंघन करून डॉल्बी लावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील. तातडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.