Sun, May 19, 2019 13:59
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › रांगड्या फुटबॉलवरही शाहिरी कवण...

रांगड्या फुटबॉलवरही शाहिरी कवण...

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : सागर यादव 

“फुटबॉल योद्धे आम्ही कोल्हापूरचे वारस आम्ही त्या महापुरुषांचे... युग प्रवर्तक श्री शिवबाचे राजर्षी शाहू छत्रपतींचे, फुटबॉल प्रेमी राजारामांचे, ज्येष्ठ खेळाडू फुटबॉल विरांचे, जगी आम्ही विजयी होणार...मैदानात इतिहास घडविणार” जी-जी-जी... अशी विविध प्रकारची शाहिरी कवणे चक्‍क कोल्हापूरच्या रांगड्या फुटबॉल खेळावर रचण्यात आली आहेत. 

श्री नेताजी तरुण मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) च्या संयुक्‍त विद्यमाने छत्रपती शाहू स्टेडियमवर ‘अटल’ चषक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात लाखो रुपयांची सर्वाधिक बक्षिसांचे पाठबळ देणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेने नावलौकीक मिळविली आहे. अशा या स्पर्धेच्या निमित्ताने शिवाजी पेठेतील शिवशाहीर दिलीप सावंत यांनी रांगड्या फुटबॉलसंदर्भातील पोवाडा रचला आहे. 

स्पर्धा संयोजकांच्या वतीने कोल्हापूरच्या शतकी फुटबॉल परंपरेचे साक्षीदार असणार्‍या ज्येष्ठ फुटबॉलपटूंचा सन्मान शिवाजी पेठ व मंगळवार पेठ येथे करण्यात आला. या कार्यक्रमांच्या निमित्ताने शाहीर दिलीप सावंत यांनी ‘फुटबॉल वीरांच्या’ पोवाड्याचे सादरीकरण करून कोल्हापूरच्या शतकी फुटबॉल परंपरेचा जणू जागरच क्रीडाप्रेमींसमोर केला. पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगून भावी पिढीला नवा इतिहास घडविण्यासाठी स्फूर्ती देणारे कार्य शाहिरांकडून केले जाते. पूर्वी लढायांतील पराक्रमाचा इतिहास सांगितला जायचा. कालओघात लढाया थांबल्या असल्या तरी अनेक क्षेत्रांत लढाईच्यावर स्पर्धा वाढली आहे. यामुळे शाहिरांनाही सद्यस्थितीवर भाष्य करणारे आणि समाजप्रबोधनपर कवणे रचावी लागत आहेत. 

पोवाड्यातून फुटबॉलपटूंना धडे...

शाहीर दिलीप सावंत यांनी आपल्या कवणातून प्रबोधनाचा उद्देश पुरेपूर बजावला आहे. पेठातील तालीम संस्था-मंडळाच्या संघातून खेळून समर्थकांच्या टाळ्यापुरता कोल्हापूर मर्यादित खेळ न करता राज्य-राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरावर पोहोचावा यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन करताना शाहीर, ‘पेठ-गाव, घरदार-वेसही सोडा तुम्ही आता, राष्ट्राचे भविष्य तुम्ही करता उद्याचे तुम्ही जगज्जेता...जी-जी-जी’. मैदानात फुटबॉलपटूंसह संघांच्या समर्थकांकडून हुल्लडबाजी केली जाते.

बहुतांशीवेळा पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतले जातात. यावर शाहिरांनी “पंचांचा आदर राखणे, शिस्त तुम्ही पाळा, खिलाडूवृत्तीचा खेळ दाखवून खेळ तुम्ही खेळा, विजय तुम्ही मिळवा जी-जी-जी” असे आवाहन केले आहे. तसेच हुल्लडबाजांसाठी “... खेळामध्ये गाजवू मैदान, आनंदात मजा याची तुम्ही घ्यावया छान, हुल्लडबाजी नको, आम्हा द्यावे प्रोत्साहन, कोल्हापूरची वाढवू तुम्ही-आम्ही शान जी-जी-जी” असे खोचक आवाहन केले आहे.

 

Tags : kolhapur, kolhapur news, atalfootball2018, Dilip Sawant, football, Povada, 


  •