होमपेज › Kolhapur › दिलबहार (अ), पीटीएम (अ) विजयी

दिलबहार (अ), पीटीएम (अ) विजयी

Published On: Jun 01 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 1:01AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘फुटबॉल महासंग्राम’ स्पर्धेत गुरुवारी दिलबहार तालीम मंडळ (अ) ने पाटाकडील तालीम मंडळ (ब) संघाचा, तर पाटाकडील तालीम मंडळ (अ) ने शिवाजी तरुण मंडळाचा पराभव करून विजय मिळविला. 

पहिली लढत दिलबहार (अ) व पाटाकडील (ब) यांच्यात झाला. सुरुवातीपासून दोन्ही संघांकडून आक्रमक खेळाचे प्रदर्शन झाले. 30 व्या मिनिटाला दिलबहारच्या सुशांत अतिग्रे याने गोल नोंदवून खाते उघडले त्यानंतर पाटाकडीलकडून रोहन कांबळे, संग्राम शिंदे, सुनीत पाटील, आकाश काटे यांनी सामन्यात बरोबरी साधण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, पहिल्या हाफमध्ये त्यांना बरोबरी साधता आली नाही. 
दुसर्‍या हाफमध्ये दिलबहारकडून 45 व्या मिनिटाला जावेद जमादारने गोल करीत संघाचा दुसरा गोल नोंदविला. दिलबहारकडून विकी सुतार, मोहसीन बागवान, अनिकेत तोरस्कर, करण चव्हाण-बंदरे यांनी आघाडी वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.

मात्र, त्यांना पाटाकडील (ब)च्या बचावफळीमुळे यश आले नाही. 65 व्या मिनिटाला पाटाकडीलकडून प्रथमेश हेरेकर याने गोल करीत संघाची आघाडी 2-1 ने कमी केली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये धोकादायक खेळीबद्दल दिलबहार संघास पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात पेनॅल्टी बहाल केली. यावर निखिल जाधवने गोल करीत सामना 3-1 ने संघास जिंकून दिला. दुसरी लढत पाटाकडील तालीम मंडळ (अ) व शिवाजी तरुण मंडळ यांच्यात झाली. सामन्याच्या प्रारंभापासून पाटाकडीलचेच वर्चस्व राहिले. पहिल्या मिनिटास पाटाकडीलकडून ओबे अकीमने गोल नोंदवत संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा तिसर्‍या मिनिटास अकीमने गोल करीत संघाची आघाडी 2-0 अशी वाढविली. त्यानंतर सहाव्या मिनिटास ओबे अकीमच्या पासवर हृषिकेश मेथे-पाटीलने गोल करीत 3-0 अशी भक्‍कम आघाडी निर्माण केली. शिवाजीकडून आकाश भोसले, अक्षय सरनाईक चांगला खेळ केला. दुसर्‍या हाफमध्ये पाटाकडीलकडून ओबे अकीम, हृषिकेश मेथे-पाटील, अक्षय मेथे-पाटील यांचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न शिवाजी तरुण मंडळच्या बचावफळीने हाणून पाडले. अखेरपर्यंत हीच गोल संख्या कायम ठेवत पाटाकडील (अ)ने सामना जिंकत विजयी घोडदौड कायम ठेवली. 

17 वर्षांखालील फुटबॉल सामने 

पहिल्या सामन्यात प्रॅक्टिस (अ) ने दिलबहार (ब) चा 2-0 गोलने, तर बालगोपाल तालीम मंडळाने उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा 2-0 गोलने पराभव केला. गडहिंग्लज युनायटेड संघाने पाटाकडील (ब) संघावर 2-0 गोलने विजय मिळविला. शिवाजी तरुण मंडळाने संध्यामठवर 5-0 अशी एकतर्फी मात केली.