Wed, Jun 26, 2019 11:32होमपेज › Kolhapur › डिझेल दरवाढीचा एसटी, केएमटीला फटका

डिझेल दरवाढीचा एसटी, केएमटीला फटका

Published On: Apr 26 2018 1:23AM | Last Updated: Apr 26 2018 12:31AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

डिझेलचे दर 70 रुपयांवर गेल्याने एसटी व केएमटी विभागाला लाखो रुपयांचा अतिरिक्‍त भार सहन करावा लागत आहे. डिझेलच्या वाढीव दरावर खर्चाची तरतूद करताना या विभागांची चांगलीच दमछाक होत आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे एसटीला महिन्याला अंदाजेे 22 लाख 90 हजार रुपये, तर केएमटीला 10 ते 12 लाख रुपयांचा अतिरिक्‍त खर्च करावा लागत आहे. 

इंधनाच्या दरात दररोज होणार्‍या बदलाचा शासनाच्या सार्वजनिक वाहतूक सेवेचे घटक असणार्‍या एसटीला सर्वाधिक फटका बसत आहे. एसटीचा तिकीट दर ठरवत असताना डिझेलचा दर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. एसटीची दरवाढ ही  ऑगस्ट 2014 साली झाली होती.त्यावेळी डिझेलचा दर 55 ते 58 रुपये लिटर होता. प्रवाशांकडून मिळणारे भाडे हे एसटी विभागाचे महत्त्वाचे उत्पन्‍नाचे स्रोत आहे. किलोमीटरप्रमाणे प्रवासी भाडे आकारत असताना वाहनाच्या स्पेअर पार्टस्चा दर, टायरचे दर, चेसीस याबरोबरच डिझेल दराचा विचार केला जातो. चार वर्षांपूर्वी हे दर ठरवत असताना डिझेलचा व सध्याच्या डिझेल दरात 12 ते 15 रुपयांचा फरक पडत आहे. एसटी विभागाला दिवसाला वाढीव डिझेलच्या तरतुदीसाठी मुंबईच्या सेंट्रल डिव्हिजनकडे अतिरिक्‍त निधीची मागणी करावी लागते. 

एसटी विभागात 12 डेपो असून, यामधून 800 एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेेसाठी अडीच लाख किलोमीटर रस्त्यावरून धावत असतात. कोल्हापूर विभागाला महिन्याला 170 टँकरद्वारे डिझेल पुरवठा केला जातो. 1 टँकरमध्ये 12 हजार लिटर डिझेल असते. केएमटीची स्थितीही वेगळी नाही. अगोदरच केएमटी तोट्यात चालली असताना डिझेल दरवाढीने ती आणखीनच डबघाईला आली आहे.   सध्या 108 बसेस रस्त्यांवरून धावत आहेत. त्यांना दररोज अंदाजे 7 हजार लिटर डिझेल लागते. पूर्वी ऑईल कंपन्यांकडून महिन्यातून दोनदा इंधन दरवाढ केली जात होती; पण आता दररोज इंधनाचे दर बदलत आहेत. गेल्या चार महिन्यांत डिझेलच्या दरात 8 रुपयांची वाढ झाली आहे. केएमटीची भाडेवाढ 2015 साली झाली होती. तेच प्रवासी भाडे आजही आहे. डिझेलवर आता 10 ते 12 लाख रुपयांची अतिरिक्‍त खर्चाची तरतूद करताना केएमटी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

Tags : Kolhapur, Diesel, escalated,  ST, KMT