Thu, Jun 20, 2019 01:50होमपेज › Kolhapur › शिरोळमधील ‘कॅन्सर’चे होणार निदान!

शिरोळमधील ‘कॅन्सर’चे होणार निदान!

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:11PMशिरोळ : शरद काळे

शिरोळ तालुक्यात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन आकडा हजारावर पोहोचला आहे. या चर्चेमुळे राज्याबरोबर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा हादरली आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे, प्रत्यक्षात तालुक्यात किती रुग्ण आहेत, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत तालुका पातळीवरील पंचायत समिती वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून येत्या पंधरा दिवसांत ‘होम टू होम’ सर्वेक्षण केले जाणार आहे. 

यासाठी लागणारा 23 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, कॅन्सरतज्ज्ञ डॉक्टर, नर्स आणि आशा वर्कर्स अशा एकूण 360 कर्मचार्‍यांकडून सर्वेक्षणास प्रारंभ होणार आहे. या वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एस. दातार यांनी दुजोरा दिला.

शिरोळ तालुक्यात हजारोंच्या संख्येत कॅन्सरचे रुग्ण असल्याची माहिती पुढे आली आहे. नेमका आकडा कुणी काढला, कशाच्या आधारावर काढला आणि यातील नेमकी सत्यता काय, याची माहिती मिळणे आवश्यक असल्याने जिल्हा नियोजन समितीने शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांचे ‘होम टू होम’ सर्वेक्षण करण्याचे नियोजन केले आहे. गत काही महिन्यांपूर्वी करवीर तालुक्यात असाच सर्व्हे करण्यात आला. याच धर्तीवर येत्या पंधरा दिवसांत शिरोळ तालुक्यात कॅन्सर रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.दातार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व्हे होणार आहे.
गत काही वर्षांत शिरोळ तालुक्यात कॅन्सर बळावत आहे. अनेक महिला, पुरुष तसेच बालकांना याची लागण झाली आहे. या चर्चेनंतर आणि लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात कॅन्सरपीडित रुग्णांबाबत मागितलेल्या वैद्यकीय मदतीनंतर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून या गंभीर प्रश्‍नाची दखल घेण्यात आली आहे.  तालुक्यात नेमके किती कॅन्सर रुग्ण आहेत, याची माहिती तालुक्यात ‘होम टू होम’ सर्व्हे करून घेतली जाणार आहे.सर्व्हेसाठी कॅन्सरवरील तज्ज्ञ डॉक्टर 20, नर्स 50 आणि आशा वर्कर्स 290 अशा एकूण 360 कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.