होमपेज › Kolhapur › खरीप भाताचे घेतले हेक्टरी ११३ क्‍विंटल उत्पादन

खरीप भाताचे घेतले हेक्टरी ११३ क्‍विंटल उत्पादन

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:28AMसुळकूड : एम.वाय.भिकाप्पा पाटील

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत सन 2017-18 सालाकरिता घेतलेल्या राज्यपातळीवरील खरीप भातपीक स्पर्धेत येथील शेतकरी धोंडिराम खानगोंडा कतगर यांनी सर्वसाधारण गटातून प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी भाताचे हेक्टरी 113 क्‍विंटल 69 किलो इतके विक्रमी उत्पादन घेतले.

त्यासाठी त्यांनी एप्रिल महिन्यात ऊस तुटून गेलेल्या जमिनीची उभी-आडवी नांगरट व पूर्वमशागतीची कामे करून जमीन भुसभुसीत बनविली. त्यानंतर जमिनीत हेक्टरी 80 गाड्या शेणखत सोडले. पॉवरट्रिलरने सारटे सोडले. त्यात हेक्टरी 150 किलो डी. ए. पी., 120 किलो निंबोळी पेंड व 53 किलो नायट्रोकीट टाकून जमिनीस पाणी दिले. विकासासाठी भाताच्या प्रोअ‍ॅग्रो 6444 या संकरित वाणाची निवड केली. त्याचे हेक्टरी 13 किलो बियाणे ते मिठाच्या पाण्यात बुडवून काढले.

बियाण्यास बुरशीनाशक रायझोबियम लावून बियाणे सुके केले. मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात 9 इंच बाय 9 इंच अंतरावर बी टोकण केले. पिकाच्या योग्य वाढीसाठी, एक महिन्यानंतर हेक्टरी 250 किलो युरिया ब्रॅकेट जमिनीत टोकून दिले. पिकास आवश्यकतेप्रमाणे दोन वेळा कोळपणी, दोनवेळा खुरपणी केली. पिकावरील खोडकिडा, करपा, तांबेरा, तुडतुडे यासाठी पं.स. कृषी सहाय्यकांच्या शिफारशीनुसार पीक संरक्षक औषधांचा वेळोवेळी वापर केला व आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या दिल्या. 70 दिवसांनी हेक्टरी 150 किलो 24-24-0 खत व 100 किलो पोटॅश दिले. ऑक्टोबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात म्हणजे साडेचार महिन्यांनी कापणी केली. त्यांना पं. स. कृषी सहायक दिलीप भाले यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.