होमपेज › Kolhapur › धनगर समाजाचे २२ मे रोजी मंत्रालयावर अनोखे ढोल वाजवा आंदोलन : शेडगे

धनगर समाजाचे २२ मे रोजी मंत्रालयावर अनोखे ढोल वाजवा आंदोलन : शेडगे

Published On: May 11 2018 1:55AM | Last Updated: May 11 2018 1:07AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धनगर समाजास अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे, या मागणीकडे दुर्लक्ष करून सरकारने फसवणूक केली आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी 22 मे रोजी दुपारी दोन वाजता आझाद मैदान ते मंत्रालय हजारो धनगर बांधव पारंपरिक पद्धतीने ढोल वाजवून, भंडारा उधळून अनोखे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य धनगर समाजोन्‍नती मंडळाचे अध्यक्ष माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शेंडगे म्हणाले, 1956 ला सर्वेक्षण करून समितीने अहवाल सादर केला. त्यानुसार केंद्र सरकारने यादीत समावेश केला गेला. मात्र, धनगरच्या ऐवजी धनगड शब्द झाल्याने अनेक पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. बिहार, झारखंड सरकारने समाजाला दहा वर्षांपूर्वी सवलती लागू केल्या आहेत. गेल्या निवडणुकीपूर्वी पंढरपूर ते बारामती आंदोलन केले. उपोषण सांगताप्रसंगी तत्कालीन भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, गेल्या चार वर्षांत 225 कॅबिनेट बैठक होऊनही निर्णय झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निवडणुकीवेळी सभेत धनगर समाजास ‘अच्छे दिन’चा शब्द दिला होता. आंदोलनात पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांतील धनगर समाजबांधव सहभागी होणार आहेत. यावेळी बाबुराव हजारे, अशोक कोळेकर, संदीप कारंडे आदी उपस्थित होते.

2019 च्या निवडणुकीत सरकारचे पानिपत...

धनगर समाजाच्या मतांवर निवडणूक जिंकून भाजपने सत्ता प्राप्त केली आहे. राजकीय इच्छाशक्‍ती नसल्याने सरकारला पुरावे देऊनही आरक्षणाचा प्रश्‍न सुटलेला नाही. सरकारने आरक्षणाबाबतचा तत्काळ निर्णय न घेतल्यास 2019 च्या निवडणुकीत पानिपत करू, असा इशाराही माजी आ. प्रकाश शेंडगे यांनी यावेळी दिला.