Sun, Mar 24, 2019 04:11होमपेज › Kolhapur › शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशालेचा विकास करणार

शिंगणापूर निवासी क्रीडा प्रशालेचा विकास करणार

Published On: Jan 30 2018 1:51AM | Last Updated: Jan 29 2018 11:21PMकसबा बावडा : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेच्या विकासाचा आराखडा तयार करून तो लवकरात लवकर कृतीत आणला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पोलिस कवायत मैदानावर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या प्रारंभप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.

शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेचा दर्जेदार विकास करण्याच्या द‍ृष्टीने लवकरच या शाळेस भेट देऊन तेथील समस्या जाणून घेऊन त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांचा सर्वसमावेशक आराखडा निश्‍चित केला जाईल. त्यानुसार समयबद्ध कार्यक्रम निश्‍चित करून या प्रशालेचा सर्वांगीण विकास केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

जिल्हा परिषदेकडील अधिकारी, कर्मचार्‍याकडून प्रशासकीय कामकाज अधिक तत्परतेने व लोकाभिमुख व्हावे यासाठी अधिकारी कर्मचार्‍यांचे आरोग्यही तंदुरुस्त असणे गरजेचे आहे यासाठीच अशा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा उपयुक्‍त ठरतील, असा विश्‍वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला. मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी स्वागत केले. 

ते म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी क्रीडा आणि संस्कृतिक स्पर्धांचे सातत्याने आयोजन केले जात असून, या तीन दिवसांच्या स्पर्धेमध्ये 941 स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धा सांघिक व वैयक्‍तिक अशा 12 खेळ क्रीडा प्रकारात खेळल्या जाणार आहेत. ध्वजारोहण करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केले. यावेळी खेळाडूंनी सादर केलेली मानवंदना पालकमंत्र्यांनी स्वीकारली. संजय लोंढे यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. प्रत्येक तालुका आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील सहभागी खेळाडूंनी विविध सांस्कृतिक देखावे सादर केले.

समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास जि.प.शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, महिला व बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, अतिरिक्‍त मुख्यकार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सुषमा देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, किरण लोहार, कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.