Thu, Apr 25, 2019 23:52होमपेज › Kolhapur › अखेर गायकवाडांच्या टपरीवर पुन्हा मिळाली बुर्जी

अखेर गायकवाडांच्या टपरीवर पुन्हा मिळाली बुर्जी

Published On: Jan 05 2018 10:35AM | Last Updated: Jan 05 2018 10:35AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद राज्यात उमटले. बुधवारी कोल्हापूरही त्याला अपवाद नव्हते. आंदोलकांनी रस्त्यावर दिसेल त्यावर दगड घातले. रेल्वे स्टेशनवरील एका गरिबाच्या बंद टपरीवर आंदोलकांनी चाल करून ती उलटून टाकली. यात टपरीधारक शोभा गायकवाड हताश होऊन बसल्या होत्या. गुरुवारी मोडलेल्या टपरीला अनेकांनी सामाजिक बांधिलकीचा हात देऊन ती पुन्हा उभी केली.

शोभा गायकवाड यांच्या पतीचा अकाली मृत्यू झाला आहे. रेल्वे फाटकाबाहेर त्यांचा बुर्जी आणि चहाचा गाडा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. राहायला घर नसल्याने ते भाड्याच्या घरात मुलगा, मुलगी असे असे तिघे राहतात. बुधवारी कोल्हापूर बंद असल्याने त्यांनी टपरी बंद ठेवली होती; पण आंदोलकांनी चाल करून ती बेचिराख केली. पतीच्या निधनानंतर श्रीमती गायकवाड यांनी जिद्दीने टपरी सुरू करून संसार थांटला होता. बुर्जी, चहा, पानपट्टीचे साहित्य विकून त्या कुटुंबाचे पालन पोषण करीत होत्या. त्यांना मुलगा गणेश व मुलगी अंजना मदत करीत होती. बुधवारी त्यांची टपरी आंदोलकांनी उद्ध्वस्त केल्याने गायकवाड कुटुंबीय हताश झाले होते. गुरुवारी कोल्हापुरातील दानशूरांनी त्यांच्या टपरीला सामाजिक बांधिलकीचा हात दिल्याने गुरुवारी रात्री टपरीवर बुर्जी व चहा शिजला. यासाठी युवा सेनेचे हर्षल सुर्वे, अ‍ॅड. सचिन आवडे, सम्राट फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीचा हात दिल्यानेच हे शक्य झाले. टपरी पुन्हा सुरू झाल्याने गायकवाड कुटुंबीयांच्या चेहर्‍यांवर आनंद ओसंडून वाहत होता.