Tue, Jul 16, 2019 13:44होमपेज › Kolhapur › पोलिसांच्या दबावाला न जुमानता दसरा चौकात या

पोलिसांच्या दबावाला न जुमानता दसरा चौकात या

Published On: Aug 09 2018 1:36AM | Last Updated: Aug 09 2018 12:31AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सरकारच्या आदेशानुसार पोलिस दलाकडून मराठा आरक्षण आंदोलन मोडण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना विविध नोटिसा बजावल्या जात आहेत. दूरध्वनीवरून मेसेज करून आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आंदोलनात सहभागी होऊ नये, असा दबाव आणला जात आहे. ठिय्या आंदोलनस्थळी येऊ नये, यासाठी नाकाबंदी व तत्सम उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांच्या या दबावाला न जुमानता संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी दसरा चौकात येण्याचे आवाहन सकल मराठा आरक्षण क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले. 

पोलिस अधिकार्‍यांकडून मोबाईलद्वारे अमूक ठिकाणचे आंदोलन स्थगित झाले, तमूक ठिकाणी आंदोलन मागे घेतले, अशा स्वरूपाचे मेसेज केले जात आहेत. तसेच दूरध्वनीवरून प्रमुख कार्यकर्त्यांना आंदोलनात सहभागी होऊ नये, अशा धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांच्या या दहशतीला न घाबरता मराठा समाजाने दसरा चौकात येऊन बंद आंदोलन यशस्वी करावे. पोलिसांकडून दडपशाहीमुळे आंदोलन चिघळल्यास सर्वस्वी जबाबदारी पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाची राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. 

पत्रकार परिषदेस वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, अवधूत पाटील, जयेश कदम, बार असो. अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अमित आडसुळे, उमेश पवार, रवी पाटील, प्रसाद जाधव, रूपेश पाटील आदी उपस्थित होते.

दसरा चौकातील सभेची जय्यत तयारी 

दरम्यान, दसरा चौकात होणार्‍या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज पुतळ्याखाली भव्य विचारमंच उभारण्यात आला आहे. पोलिसांकडून शहराबाहेर पार्किंगसाठी दबाव आणला जात आहे. मात्र, सभेला ज्येष्ठ नागरिक, महिला-मुलांचा सहभाग असल्याने त्यांनी आपली वाहने दसरा चौकाच्या शक्य तितक्या जवळ आणावीत. मेरी वेदर मैदान, सासने मैदान, राजारामपुरी शाळा, आयर्विन ख्रिश्‍चनचे मैदान, शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा शिस्तबद्ध पार्किंग करण्याचे आणि एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केमिस्ट असोसिएशन, मेरी वॉन्लेस हॉस्पिटल व जगद्गुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या वतीने डॉ. संदीप पाटील, कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार, डॉ. योगेश आनप, डॉ. प्रसाद तानवडे, डॉ. पराग वाटवे यांच्या सोबत 25 जणांचे वैद्यकीय पथक अत्याधुनिक अ‍ॅम्ब्युलन्ससह दक्ष असणार आहे.