Mon, Mar 25, 2019 03:24
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › निधी असूनही सीपीआरची अनास्था

निधी असूनही सीपीआरची अनास्था

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:31PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

निधीच्या उपलब्धततेअभावी सुविधांची परवड हा अनुभव सार्वत्रिक झाला असला तरी कोल्हापूरकरांच्या गाठीशी निधी उपलब्ध असूनही सुविधांची परवड असा नवा अनुभव छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयाने घालून दिला आहे. सीपीआर रुग्णालयातील हृदयरुग्णांना संजीवनी देऊ शकणारी ‘आयएबीपी’ हे यंत्र जुने पुराणे झाल्यामुळे नव्या यंत्राची तातडीची निकड होती. या यंत्रासाठी दानशूर दात्याची गरज अशा आशयाचे वृत्त दै. ‘पुढारी’ने 15 मार्च रोजी दिले होते. त्याची दखल घेऊन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने 56 लाख रुपयांचा धनादेश राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द केला. तथापि या यंत्राच्या खरेदीची प्रक्रिया राबवायची कुणी? यामध्ये गेले अडीच महिने हे घोंगडे भिजत पडले आहे. यामुळे रुग्णांची परवड तर होते आहेच, शिवाय सीपीआर रुग्णालयाला सढळ हस्ते मदत करणार्‍या दात्यांच्या मनामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

सीपीआर रुग्णालयात सन 1999 मध्ये हृदय शस्त्रक्रिया विभागाची उभारणी झाली. या विभागातून केवळ कोल्हापूरच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातील हजारो हृदयरुग्णांना लाभ मिळाला आहे. या रुग्णालयात प्रामुख्याने हृदय शस्त्रक्रिया व चिकित्सा याकरिता जी यंत्रसामग्री उभारण्यात आली होती. त्यामध्ये इंट्रा अ‍ॅव्हॉर्टिक बलून पंप नावाचे सुमारे 75 लाख रुपये किमतीचे एक यंत्र उपलब्ध करून देण्यात आले होते.

हे यंत्र त्याचा वापर आणि वयोमानामुळे सतत नादुरुस्त होते आहे. 1996 सालाच्या बनावटीच्या असलेल्या या यंत्राचे सुटे भागही उपलब्ध होत नसल्याने काही वर्षांपूर्वी यंत्राची निर्माते असलेल्या डाटा स्कोप कंपनीने काही वर्षांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयाला यापुढे देखभाल दुरुस्तीचीसेवा देता येणार नाही असे स्पष्ट केले होते. साहजिकच या रुग्णालयात येणार्‍या जोखमीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या पाहता नव्या यंत्राच्या उपलब्धततेची गरज निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर ङ्गदै. पुढारीफने एका विशेष वृत्ताद्वारे समाजाचे या समस्येकडे लक्ष वेधले. या वृत्तात जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींना, विशेषतः कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी अंतर्गत उद्योग समूहांना मदतीचे आवाहन केले होते. यानुसार पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्धही करुन दिला. पण प्रत्यक्षात खरेदी प्रक्रियेच्या लालफितीत हे यंत्र अडकले आहे. 

हृदयशल्य विज्ञानाच्या परिभाषेत इंट्रा अ‍ॅव्हॉर्टिक बलून पंप या यंत्राला संक्षिप्तरित्या आयएबीपी या नावाने ओळखले जाते. हृदय शस्त्रक्रियेवेळी हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. सीपीआर रुग्णालयात हृदयाची अत्यंत कमकुवत क्षमता असलेले आणि जोखमीची शस्त्रक्रिया आवश्यक असलेले अनेक रुग्ण दाखल होतात. विशेषतः बायपास सर्जरीमध्ये अथवा हृदयाचा झटका आलेल्या रुग्णांसाठी हे यंत्र संजीवकाची भूमिका बजावत असते. या यंत्रासाठी मार्च अखेरीसच वैद्यकीय महाविद्यालयाकडे निधी उपलब्ध झाला होता.

परंतु संबंधित यंत्राची रक्कम मोठी असल्याने त्याच्या खरेदीचे सोपस्कार वैद्यकीय संचलनालयाकडून राबविण्याची आवश्यकता होती. प्रत्यक्षात शासनाने संचलनालयाचे अधिकार हाफकिन इन्स्टिट्यूटकडे वर्ग केले आणि हाफकिनच्या कारभारावरच प्रश्‍नचिन्ह उभे केले जात असल्याने ही खरेदी अडकली आहे. यावर तोडगा म्हणून वैद्यकीय संचलनालयाने संबंधित यंत्राची खरेदी दात्यानेच करुन द्यावी असा पर्याय सुचविल्याचे समजते. परंतु वैद्यक शास्त्रासाठी लागणार्‍या यंत्रसामुग्रीचा दर्जा आणि तपशील तपासण्याची यंत्रणा दात्याकडे नसल्याने हा पर्याय व्यवहार्य वाटत नाही असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच निधी उपलब्ध असूनही केवळ लालफितीच्या कारभाराने यंत्राच्या आगमनात अडथळे निर्माण झाले आहेत.