Sat, Apr 20, 2019 08:34होमपेज › Kolhapur › उपनगराध्यक्ष मोरबाळे यांचा राजीनामा

उपनगराध्यक्ष मोरबाळे यांचा राजीनामा

Published On: Jan 02 2018 1:33AM | Last Updated: Jan 01 2018 11:13PM

बुकमार्क करा
इचलकरंजी : वार्ताहर

इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे वर्षभराचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे त्यांनी राजीनामा नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांना सादर केला. नूतन उपनगराध्यक्ष निवडीसाठी 5 जानेवारी रोजी सभा होणार आहे. 

इचलकरंजी पालिकेत भाजप, ताराराणी आघाडी व राष्ट्रवादीची सत्ता आहे. वर्षभरापूर्वी सत्ता स्थापन करताना ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे उपनगराध्यक्षपद ताराराणी आघाडीकडे होते. त्यामुळे मोरबाळे यांची वर्णी लागली होती. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाल ठरवण्यात आला होता. त्यांनी आज पदाचा राजीनामा सादर केला.

वर्षभराच्या कालावधीत पालिकेच्या उत्पन्‍नवाढीसाठी गाळ्यांची लिलाव प्रक्रिया, पालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न, नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून विविध 67 विषयांना मंजुरी, गुंठेवारी, टीपी स्कीम, अतिक्रमणे हटवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात वैद्यकीय सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा, पालिकेचे रेकॉर्ड अद्ययावत करून स्कॅनिंग, पालिकेच्या तसलमात रकमेची वसुली आदी महत्त्वाची कामे मार्गी लावल्याचे मोरबाळे यांनी सांगितले. उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी या पदावर इकबाल कलावंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.