Fri, May 29, 2020 02:02होमपेज › Kolhapur › उपजिल्हाधिकार्‍यांची चार पदे रिक्‍त

उपजिल्हाधिकार्‍यांची चार पदे रिक्‍त

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 16 2018 11:28PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 14 पैकी चार उपजिल्हाधिकार्‍यांची पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्‍तच आहेत. या पदांचा अतिरिक्‍त कार्यभार सांभाळताना अन्य अधिकार्‍यांची दमछाक होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. काही दिवसांतच उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या होत आहेत, या पार्श्‍वभूमीवर तरी जिल्ह्यातील रिक्‍त पदे भरणार का, असा सवाल व्यक्‍त होत आहे.

जिल्ह्यात उपजिल्हाधिकार्‍यांची 14 पदे आहेत. त्यापैकी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी ही चार पदे रिक्‍तच आहेत. या पदांचा कार्यभार कोल्हापुरात कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. दैनंदिन कामकाजासह या पदाचा कार्यभार सांभाळताना सध्या त्यांना कसरत करावी लागत आहे.सध्या सुट्टीचा महिना असल्याने अनेक अधिकारी रजेवर जातात. घरगुती कामे, मुलांची शिक्षण विषयक कामे आदीं कामे या महिन्यातच केली जात असल्याने कार्यरत अधिकार्‍यांना सुट्टी हवी आहे. मात्र, त्याचा कार्यभार कोणाला द्यायचा, एका व्यक्‍तीकडे किती पदाचा कार्यभार द्यायचा असाही प्रश्‍न आहे. सध्या एका अधिकार्‍याकडे तीन पदांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

48 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदी बढती

राज्यात 48 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्‍नती देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे व पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्ह्यात भुदरगड व करमणूक तहसीलदार म्हणून काम केलेल्या मोहिनी चव्हाण यांचाही यामध्ये समावेश आहे. 48 तहसीलदारांना पदोन्‍नती मिळाल्याने यावर्षी उपजिल्हाधिकार्‍यांची सर्व पदे भरली जातील अशी शक्यता आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात बदल्यांची धांदल

जिल्हाधिकारी कार्यालयात बदल्यांची धांदल सुरू आहे. या महिन्याअखेरीस बदल्या केल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी बदल्या झाल्या नव्हत्या. यामुळे यावर्षी बदल्यात कोणावरही अन्याय होणार नाही, याद‍ृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे.


21 वर्षांनी सेवा ज्येष्ठता याद्या

तलाठी, लिपिक, मंडल अधिकारी व अव्वल कारकून यांच्या सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्यात आल्या आहेत. तब्बल 21 वर्षांनंतर या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. पुणे विभागीय आयुक्‍तांच्या आदेशानुसार 1997 पासूनच्या या याद्या करण्यात आल्या आहेत. प्राथमिक याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. आलेल्या हरकतींवर निर्णय झाल्यानंतरच अंतिम सेवा ज्येष्ठता याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.