Sat, Jan 19, 2019 05:39



होमपेज › Kolhapur › प्रतिटन 2300 प्रमाणे रक्कम खात्यावर जमा

प्रतिटन 2300 प्रमाणे रक्कम खात्यावर जमा

Published On: Jan 12 2019 1:46AM | Last Updated: Jan 12 2019 1:46AM




कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांनी नोव्हेंबरअखेर तुटलेल्या उसाची, प्रतिटन 2300 रुपयांप्रमाणे पहिल्या उचलीची रक्कम शुक्रवारी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा केली. कारखान्यांच्या या कृतीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 30 नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात 19 लाख 12 हजार टन गाळप झाले आहे. यापोटी 439.77 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेचा जोर असल्याने त्यांनी एफआरपी एकरकमीचा आग्रह धरला आहे. त्यासाठी प्रसंगी आंदोलनाचा इशारा देताना, कमी एफआरपी भरणारे कारखाने फोडण्याचा इशारा दिला आहे. यात सरकारने हस्तक्षेप करून एकरकमी एफआरपीसाठी कमी पडणारी प्रतिटन 500 रुपयांची रक्कम शासनाने द्यावी, साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 3400 रुपये करावा, अशी कारखानदारांची मागणी होती. या मागणीसाठी मंगळवारी कारखानदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले, त्यांनी गुरुवारी (दि. 10) मार्ग काढण्याचे आश्‍वासन दिले होेते; पण ही चर्चा पुढे सरकलीच नाही.

सरकारकडून काही मदत मिळणार नाही, हे निश्‍चित झाल्यानंतर आज जिल्ह्यातील बहुंताशी कारखान्यांनी 30 नोव्हेंबरअखेर तुटलेल्या उसाला प्रतिटन 2300 रुपयांप्रमाणे शेतकर्‍यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले. जिल्ह्यात 14 सहकारी व 7 खासगी असे 21 कारखाने आहेत. यापैकी आठ कारखान्यांना जिल्हा बँकेचा फायनान्स आहे, या आठ कारखान्यांचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले. वारणा वगळता उर्वरित कारखान्यांनीही याचप्रमाणे पैसे जमा केले. वारणाकडून सोमवारी पैसे जमा होण्याची शक्यता आहे. जिल्ह्याची कारखानानिहाय सरासरी एफआरपी 2300 ते 2950 पर्यंत आहे. आज कारखान्यांनी जमा केलेले पैसे व प्रत्यक्ष द्यावी लागणारी एफआरपी यात प्रतिटन 500-600 रुपये कमी भरले आहेत.