Thu, Apr 25, 2019 18:40होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : डेंग्यू डास बनला ‘कमजोर’

कोल्हापूर : डेंग्यू डास बनला ‘कमजोर’

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:23AMकोल्हापूर : विजय पाटील

डेंग्यूच्या डासाची (एडिस इजिप्‍ती) दहशत यंदा वाढली आहे. शहरासह जिल्ह्यात डेंग्यू झालेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. तथापि, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा या डासाचा व्हायरस कमजोर बनला असल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. व्हायरस कमजोर बनला असला तरी रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार करण्याशिवाय पर्याय नाही, हेही तितकेच खरे असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम डेंंग्यूच्या व्हायरसवर होत असल्याने पुढील वर्षी हा व्हायरस अधिक मजबूतही होऊ शकतो किंवा आणखी कमजोरही होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

शहरासह जिल्ह्यात या डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शहर परिसरात तर यंदा डेंग्यूने आजारी पडणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. पांढरे पट्टे असणारे हे डास शहरातील जवळपास सर्वच भागात दिसत आहेत. त्यामुळेच मागील दोन महिन्यांपासून डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हे डास स्वच्छ पाण्याच्या साठ्यात वाढतात, हे माहीत असूनही अद्याप लोकांमध्ये जागृती नसल्याचे दिसून येते. घरात ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात, फ्रीजच्या ट्रेमध्ये, झाडांच्या कुंडीत तसेच परिसरात साचलेल्या पाण्यात या डासाची अंडी आणि शेकडो डास आढळून येत आहेत. शहरात अनेक परिसरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना महापालिका आरोग्य विभागासह सरकारी आरोग्य विभागाचीही अपेक्षेप्रमाणे कारवाई दिसून येत नाही.

डेंग्यू झालेल्या रुग्णावर वेळेत उपचार झाले, तर आजार आटोक्यात ठेवता येतो; पण उपचाराला वेळ लागला, तर रुग्णाला गंभीर परिणामाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या डासांची दहशत सर्वसामान्यांवर आहे.

डास कमजोर म्हणजे काय?

डेंग्यूची टेस्ट करताना संबंधिताच्या शरीरात एनएस-1 चाचणीच्या माध्यमातून डेंग्यूचा व्हायरस आहे का, ते पाहिले जाते. हा व्हायरस असेल तर डेंग्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्‍न होते. आयजीजी व आयजीएम चाचणीच्या माध्यमातून प्रतिजैविके रुग्णाच्या शरीरात तयार झाली का, ते पाहिले जाते. प्रतिजैविके तयार झाली, तर साहजिकच प्लेटलेटस्ची संख्या वेगाने कमी होते. हे धोकादायक ठरू शकते; पण यंदा बहुतेक रुग्णांमध्ये प्लेटलेटस्ची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे यंदा या डासाचा व्हायरस कमजोर झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.