Sat, Mar 23, 2019 02:11होमपेज › Kolhapur › इचलकरंजी शहरावरही डेंग्यूचे सावट

इचलकरंजी शहरावरही डेंग्यूचे सावट

Published On: Jun 30 2018 1:16AM | Last Updated: Jun 29 2018 11:20PMइचलकरंजी : प्रतिनिधी 

इचलकरंजी शहर व परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे सुमारे 33 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी शहरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य विभाग व नागरी आरोग्य केंद्राच्या सुमारे 500 कर्मचार्‍यांनी शहापूर, लालनगर, गावभाग, तांबेमाळ, जवाहरनगर, कलावंत गल्ली आदी भागांत जाऊन घरोघरी सर्वेेक्षण केले.

सर्व्हे करण्यात आलेल्या 51 हजार 111 घरांमध्ये 3944 दूषित कंटेनर मिळून आले, तर ताप रुग्णांची संख्या 168 वर पोहोचली. डेंग्यूचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबरोबरच थंडी-तापाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने औषधोपचार घेणे हाच डेंग्यू रोखण्यावरचा उपाय असल्याचे पालिका प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आले. 

इचलकरंजी शहरातील विविध भागांत डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पालिका प्रशासनाकडून डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी नगरसेवकांनीही सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर आरोग्य यंत्रणेने भागाभागात सर्व्हे करून, उपाययोजना सुरू केल्या आहेत.