Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Kolhapur › कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा

कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा

Published On: Aug 18 2018 1:21AM | Last Updated: Aug 18 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा पडत आहे. शहरात सुमारे पाचशेच्यावर डेंग्यूचे रुग्ण आहेत. यात दोन-चार वर्षांच्या बालकांचाही समावेश आहे. काही माजी नगरसेवकांनाही डेंग्यू झाला असून, विद्यमान नगरसेवकांच्या नातेवाईकांचाही डेंग्यू रुग्णांत समावेश आहे. प्रत्येक गल्ली आणि कॉलनीत डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त बनली आहे. शहरात डेंग्यूने थैमान घातले असूनही अधिकारी निवांत असल्याचे दिसत आहे. 

जानेवारीपासून आजपर्यंत कोल्हापूर शहरातील तब्बल 1 हजार 561 जणांना डेंग्यू झाला आहे. जानेवारी - 33, फेब्रुवारी - 9, मार्च - 5, एप्रिल - 24, मे - 113, जून - 518, जुलै - 359 अशी ही आकडेवारी आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सुमारे 500 जणांना डेंग्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीवरून ही माहिती समोर आहे. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होत असून त्यात गेल्या चार महिन्यांत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी जुलैमध्ये म्हणजे एका महिन्यात चार जणांचा तर गेल्या आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला होता.  

गेल्या महिन्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अकरा टीम तयार करून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. तब्बल पन्‍नास हजारांवर घरात जाऊन तपासणी करण्यात आली होती. अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडल्या होत्या. कर्मचार्‍यांनी पाणी ओतून डेंग्यू डासाच्या अळ्या नष्ट केल्या होत्या; परंतु ते सर्वेक्षण फक्‍त दहा दिवसांपुरते होते. त्यानंतर पुन्हा महापालिकेची यंत्रणा ठप्प झाली. परिणामी पुन्हा डेंग्यूचा फैलाव झाल्याचे स्पष्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील बांधकाम साईटवर, इमारतीच्या बेसमेंटमध्ये, खराब टायर व इतरत्र साठलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू डासांच्या अळ्या निर्माण झाल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण आहे.