Tue, Jul 23, 2019 04:05होमपेज › Kolhapur › राज्य उत्पादन शुल्कमधील दुय्यम निरीक्षकांची पदावनती

राज्य उत्पादन शुल्कमधील दुय्यम निरीक्षकांची पदावनती

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 12:51AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण 

राज्य उत्पादन शुल्क विभागातील 110 दुय्यम निरीक्षकांची पदावनती (डिमोशन) करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी  काढण्यात आले. या निर्णयामुळे दुय्यम निरीक्षक पदावर काम करणार्‍यांना त्यांच्या हवालदार, जवान अशा पूर्व पदावर नियुक्‍त करण्यात आले आहे. या निर्णयाने उत्पादन शुल्क खात्यातील अधिकार्‍यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. या नव्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील 6 अधिकार्‍यांना बसला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात अधिकार्‍यांची संख्या कमी होती. लोकसेवा आयोगामार्फत खात्यातील अधिकार्‍यांच्या जागा भरल्या गेल्या नव्हत्या. यामुळे 2012 पासून 2017 पर्यंत खात्यातील जवान, हवालदार, वाहनचालक यांना पदोन्‍नती देऊन दुय्यम निरीक्षक या पदावर नियुक्‍ती केली जात होती. पदोन्‍नती करताना संबंधितांना वेतनवाढ, तसेच सुधारित वेतनश्रेणी देण्यात येत होत्या. मात्र, दुय्यम निरीक्षक म्हणून कायम नियुक्त्या करण्यात येत नव्हत्या, त्याऐवजी 11 महिन्यांसाठी या पदोन्‍नत्या करून त्याला मुदतवाढ देण्यात येत होती.

लोकसेवा आयोगाकडून उमेदवार उपलब्ध होईपर्यंत या पदोन्‍नती देण्यात येत होत्या. गेली सहा वर्षे या पद्धतीने पदोन्‍नतीद्वारे नेमणुका केल्या जात होत्या. या सहा वर्षांत राज्यातील 110 हवालदार, जवान, तसेच चालक या पदावरील कर्मचार्‍यांना पदोन्‍नती देण्यात आली आहे. पदोन्‍नतीनंतर देय असणारे सर्व लाभ आणि सवलती त्यांना देण्यात आल्या. मात्र, बुधवारी या सर्व अधिकार्‍यांच्या सेवा खंडित करण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. पदावनती झालेल्यांमध्ये सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येकी 4 अधिकार्‍यांचा समावेश आहे. 

बुधवारी आयुक्‍त डॉ. अश्‍विनी जोशी यांनी पदोन्‍नतीवर घेतलेल्या सर्व दुय्यम निरीक्षकांची सलग सेवा खंडित करण्याचे लेखी आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांत नाराजीचा सूर  आहे. खात्याच्या पडत्या काळात काम करून खात्याला आणि शासनाला चांगला महसूल मिळवून दिला; पण आता पदावन्‍नती करून कर्मचार्‍यांना दु:ख देण्याचे काम केले जात आहे, अशा भावनाही व्यक्‍त केल्या जात आहेत.